नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रशियाने युपेनवर आक्रमण केल्यानंतर तेलाच्या किमती झपाटय़ाने वाढू लागल्या आहेत. तेल मंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण कक्षाकडून उपलब्ध आकडेवारीनुसार, क्रूड ऑईलची (इंडियन बास्केट) किंमत 9 जून रोजी 121.28 अमेरिकन डॉलरवर पोहोचली आहे. शुक्रवारी त्यात आणखी वाढ होत दर 122.26 डॉलर्स या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. यापूर्वी फेब्रुवारी-मार्च 2012 मध्ये कच्च्या तेलाचे दर या पातळीवर पोहोचले होते.
30 मार्च ते 27 एप्रिलदरम्यान कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रतिबॅरल 103.44 डॉलर होती. अमेरिकेसारख्या प्रमुख खरेदीदारांकडून मागणी वाढल्याने गुरुवारी आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती 13 आठवडय़ांच्या उच्चांकावर पोहोचल्या. आता या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढू शकतात. गेल्या महिन्यात सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात केल्यानंतर दर कमी करण्यात आले होते.









