सध्या प्लास्टीक तसेच सहजगत्या आणि नैसर्गिकरीत्या विघटित न होणाऱया पदार्थांपासून होणाऱया प्रदूषणाची समस्या हाताबाहेर जाताना दिसत आहे. बहुतेक विकसनशील देशांमध्ये शहरात रस्तोरस्ती प्लास्टीकच्या कचऱयाचे ढीग दिसून येतात. यामुळे पर्यावरणाची मोठय़ा प्रमाणावर हानी होत असून यावर नियंत्रण न आणल्यास मानवी जीवनासाठीही धोका निर्माण होणार आहे, असा इशारा संशोधकांनी अनेक वर्षांपूर्वीच दिला आहे. आता या समस्येवर रामबाण उपाय सापडल्याचे प्रतिपादन करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनी एका अशा किडय़ाचा शोध लावला आहे की ज्याचा आहारच प्लास्टीक किंवा थर्मोकोल आहे.
या सुपरवर्मचे नाव जोफोबास मेरिओ असे ठेवण्यात आले आहे. हा अळीच्या स्वरुपातील (लारवा) किडा आहे. पॉलिस्टराईन नामक प्लास्टीक हा त्याचा आवडता खाद्यपदार्थ असल्याचे दिसून आले आहे. हे प्लास्टीक तो सहजगत्या पचवू शकतो. या किडय़ाच्या पोटात विशिष्ट बॅक्टेरिया निर्माण होत असतात. हे बॅक्टेरिया प्लास्टीकचे विघटन करून त्यापासून या किडय़ाचे अन्न बनवितात. या किडय़ाची लांबी 5 ते 6 सें. मी. इतकी असून मेक्सिको व थायलंड या देशातील लोक या किडय़ावर ताव मारतात. म्हणजेच हा किडा दोन प्रकारे लाभदायक आहे. एक तर हजारो वर्षे साचून राहू शकणाऱया प्लास्टीकचा तो नाश करतो. शिवाय माणसाचे खाद्य म्हणूनही त्याचा उपयोग हेतो. अशा बहुगुणी किडय़ाचे उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या किडय़ापासून मानवाला किंवा अन्य प्राण्यांना तसेच निसर्गाचक्राला काही अपाय होत नाही, ही बाब सिद्ध झाल्यास प्लास्टीक कचऱयाची समस्या संपल्यात जमा आहे, असे संशोधकांचे मत आहे.
या किडय़ावर सविस्तर संशोधन सुरू आहे. अन्य काही प्रजातींचे किडे यासाठी उपयोगी पडतात का, हे देखील पाहिले जात आहे. किडय़ाच्या पोटातील बॅक्टेरियाचे देखील स्वतंत्ररीत्या उत्पादन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. किडय़ापेक्षा त्याच्या पोटातील बॅक्टेरिया प्लास्टीकच्या समस्येचा नायनाट करण्यासाठी उपयोगी ठरेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. येत्या आठ-दहा वर्षात हे संशोधन प्लास्टीकच्या समस्येवर उपाय म्हणून पुढे येईल, अशी शक्मयता आहे.









