कुपवाडामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे-दारूगोळा जप्त : सुरक्षा दलांना मोठे यश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिह्यात नियंत्रण रेषेजवळ सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोधमोहीम राबवत मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रs आणि दारूगोळा जप्त केला. विशेष गुप्तचर माहितीच्या आधारे ही कारवाई सुरू करण्यात आली. सुरक्षा दलांना दहशतवाद्यांनी सीमेपलीकडून शस्त्रास्त्रांची तस्करी केल्याची माहिती मिळाली होती. गुप्तचर माहितीच्या आधारे ही कारवाई हाती घेण्यात आली होती.
सुरक्षा दलांनी केलेल्या या कारवाईत लष्कर आणि पोलीस दलाने संयुक्तपणे कुपवाडाच्या कर्नाह भागातील अमरोही गावात शोधमोहीम राबवली. यादरम्यान, सरकारी अन्न साठवणूक इमारतीजवळ झडती घेण्यात आली. त्याठिकाणी दोन एके-47 रायफल, दोन एके मॅगझिन आणि 12 राऊंड दारूगोळा जप्त करण्यात आला. ही कारवाई सुरक्षा दलांचे एक महत्त्वाचे यश म्हणून पाहिली जात आहे. अशी तस्करी अनेकदा दहशतवाद्यांची शस्त्रs साठवण्यासाठी केली जाते.
जप्त केलेली शस्त्रs आणि दारूगोळा मिळवणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी सुरक्षा दल आता सतत छापे टाकत आहेत. ही जप्ती दहशतवादाविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईतील एक महत्त्वाचे पाऊल असल्यामुळे काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून करण्यात येणाऱ्या कारवाईला आणखी बळकटी मिळेल.
पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयने अनेक लाँच पॅड सक्रिय केले असून घुसखोरीसाठी दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेवर त्यांचे स्थान मजबूत केल्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी सुरक्षा दलांना दिला आहे. अलिकडेच लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांनी 5 फेब्रुवारी रोजी एक संयुक्त सभा आयोजित केली होती. या बैठकीला हमासचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. दहशतवादी संघटना आपल्या रणनीतीत वेळोवेळी बदल करत असल्यामुळे काश्मीरमधील सुरक्षा परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होऊ शकते.









