वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लींच्या पोलिसांनी दिल्लीच्या द्वारका भागात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 16 विदेशी नागरीकांना त्यांच्या देशांमध्ये परत पाठविले आहे. हे लोक त्यांच्या व्हिसाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही भारतातून परत गेले नव्हते. या नागरीकांमध्ये बांगला देशचे 5, नायजेरियाचे 9, गिनियाचा 1 आणि उझबेकिस्तानचा 1 यांचा समावेश आहे. बांगला देशच्या बेकायदा लोकांमध्ये चार जणांचे एक कुटुंबही आहे. या कुटुंबात दोन मुलांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेने त्या देशात बेकायदा स्थलांतरित झालेल्या 104 नागरीकांची भारतात परतपाठवणी केली होती. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेत बेकायदा मार्गाने स्थलांतरित झालेल्या लोकांना त्यांच्या देशांमध्ये पाठविण्याचे अभियान हाती घेतले आहे. आता भारत सरकारनेही असे अभियान चालवावे आणि भारतात घुसलेल्या बेकायदा लोकांना त्यांच्या देशात परत पाठवावे, अशी मागणी केली जात आहे. भारत सरकारने अमेरिकेच्या प्रशासनाला या संदर्भात पाठिंबा दिल्याने भारतही आपल्या देशातील बेकायदा स्थलांतरीतांच्या संदर्भात असेच कठोर धोरण स्वीकारेल, अशी अपेक्षा आहे.









