कोचमध्ये कोळसा, लाकडेही सापडली
वृत्तसंस्था/ लखनौ
तामिळनाडूतील मदुराई जंक्शनजवळ एका टेनच्या खासगी डब्याला सिलिंडर स्फोटानंतर लागलेल्या आगीप्रकरणी सरकारी रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) उत्तर प्रदेशमधील एका ट्रॅव्हल एजन्सीविऊद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीतापूर येथील भसीन ट्रॅव्हल एजन्सीविऊद्ध जीआरपीने गुन्हा दाखल केला आहे. सदर ट्रॅव्हल एजन्सी ऑपरेटरने आयआरसीटीसीद्वारे कोच बुक केला होता. या कोचमध्ये उत्तर प्रदेशातील 63 लोक प्रवास करत होते. त्यांनी दक्षिणेकडील राज्यांमधील देवदर्शनाच्या निमित्ताने 17 ऑगस्टपासून रेल्वेप्रवास सुरू केला होता.
मदुराई येथे रेल्वे कोचमध्ये झालेल्या सिलिंडर स्फोटाच्या दुर्घटनेत रेल्वेचा घोर निष्काळजीपणाही समोर येत आहे. खासगी पार्टीच्या डब्यात गॅस सिलिंडर असल्याची माहिती असतानाही रेल्वे प्रशासनाने कारवाई न केल्याने एवढी मोठी दुर्घटना घडल्याचा दावा केला जात आहे.
उत्तरप्रदेशमधील एका ट्रॅव्हल एजन्सीने रामेश्वरमला भेट देण्यासाठी रेल्वेचा एक कोच बुक केला होता. या कोचमध्ये शनिवारी सिलिंडर स्फोटाची दुर्घटना घडली होती. या मदुराई रेल्वे अपघाताच्या घटनेची चौकशी करण्यात येत आहे. उच्चस्तरीय आढावा सुरू असून या घटनेत जो कोणी सहभागी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. प्राथमिक तपासणीत स्फोट झालेल्या कोचमध्ये लाकडे आणि कोळसा अशा वस्तूही सापडल्याने रेल्वे अधिकाऱ्यांचा दुर्लक्षितपणाही दिसून येत आहे.
नियमांनुसार, कोणतीही व्यक्ती आयआरसीटीसी पोर्टलचा वापर करून खासगी स्वरुपात एखादा कोच बुक करू शकते, परंतु त्याला डब्यात गॅस सिलिंडर किंवा कोणतीही ज्वलनशील सामग्री ठेवण्याची परवानगी नसते. सदर कोचचा वापर फक्त प्रवाशांसाठी केला जाऊ शकतो. मात्र, येथे सिलिंडरसारख्या ज्वलनशील वस्तूची वाहतूक रेल्वे कोचमधून करण्यात आल्याने मोठी दुर्घटना घडली.
फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू
या अपघातानंतर दक्षिण रेल्वेने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. टेनमध्ये ठेवलेल्या घरगुती गॅस सिलेंडरमुळे आग लागल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हा गॅस सिलिंडर टेनमध्ये बेकायदेशीरपणे ठेवण्यात आला होता. डब्यात कोळसा आणि लाकूडही सापडले आहे. याशिवाय फॉरेन्सिक टीमही रविवारी सकाळी घटनास्थळी पोहोचली आणि पुरावे गोळा करण्यास सुऊवात केली. या पुराव्यांमध्ये प्रवासादरम्यान गॅसच्या चुलीवर अन्न शिजवले जात असल्याचे तर ट्रेन काही तासांसाठी यार्डमध्ये थांबली असताना लाकूड व कोळशांवर स्वयंपाक केला जात असल्याची बाब स्पष्ट झाली आहे.









