बेळगाव : पशुसंगोपन आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून जिल्ह्यात 497 पशुसखींची नेमणूक केली आहे. त्यामुळे प्रत्येक जनावराला वेळेत आरोग्यसेवा मिळण्यास मदत होत आहे. लसीकरण व इतर सुविधा पशुपालकांच्या गोठ्यापर्यंत पोहोचू लागल्या आहेत. त्यामुळे पशुसखींचे महत्त्व अधोरेखीत होत आहे. शासनाने जनावरांना वेळेत उपचार आणि आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रत्येक ग्रा.पं. हद्दीत एका पशुसखीची नेमणूक केली आहे. दरम्यान, ग्रा.पं. हद्दीतील जनावरांच्या आरोग्याची काळजी पशुसखींवर राहणार आहे. याबाबतची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पुरविणे गरजेचे आहे. त्यामुळे दुर्गम आणि ग्रामीण भागातील जनावरांवर वेळेत उपचार आणि लसीकरण होणार आहे.
जिल्ह्यात जनावरांची संख्या 28 लाखांहून अधिक आहे. यामध्ये गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, कुत्रा, मांजर, घोडा, बैल आदींचा समावेश आहे. अलीकडे जनावरांना विविध रोगांची लागण होत आहे. लम्पी रोगाने हजारो जनावरांचा बळी गेला आहे. त्यामुळे शासनाने खबरदारी म्हणून विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. प्रत्येक जनावराला वेळेत उपचार मिळावेत आणि त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी पशुसखी ही संकल्पना पुढे आणली आहे. या अंतर्गत ग्रा.पं. हद्दीतील एखादे जनावर आजारी पडल्यास किंवा लसीकरणाबाबत माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पुरविली जाणार आहे. यासाठीच पशुसखींची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यात 497 पशुसखींची नेमणूक केली आहे. त्यामुळे औषध आणि लसीकरण पुरवठा यांचे नियोजन होत आहे. शिवाय एकूण जनावरे आणि लसीकरणापासून वंचित जनावरे आदी सर्व तपशील उपलब्ध होत आहे. जनावरांना निरोगी ठेवण्यासाठी पशुसंगोपनचे प्रयत्न सुरू आहेत. याला पशुसखींचा हातभार लागत आहे.









