प्लांट मागील बाजूस करण्याची नागरिकांतून मागणी
बेळगाव : हुतात्मा चौक येथील हुतात्मा स्मारकाशेजारी पिण्याच्या पाण्याचा आरओ प्लांट उभारला जात आहे. परंतु, या आरओ प्लांटमुळे हुतात्मा स्मारकाचे गांभीर्य हरवण्याची शक्यता आहे. यामुळे हा आरओ प्लांट हुतात्मा स्मारकाच्या मागील जागेत करावा, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांमधून केली जात आहे. हुतात्मा स्मारक हे बेळगावमधील हुतात्म्यांची आठवण करून देणारे एक स्मारक आहे. प्रत्येक वर्षी ऑगस्ट क्रांतीदिनी येथे अभिवादन केले जाते. स्वातंत्र्यसैनिक व उत्तराधिकारी संघाचे पदाधिकारी तसेच स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार या ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करतात. त्यामुळे या स्मारकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मनपातर्फे गेल्या आठवडाभरापासून मुख्य रस्त्याच्या शेजारीच आरओ प्लांटचे बांधकाम सुरू आहे. प्लांट बरोबर हुतात्मा स्मारकाच्या समोरील बाजूस असल्याने स्मारकाच्या सौंदर्यीकरणामध्ये अडथळे येणार आहेत. प्लांटचे संपूर्ण बांधकाम झाल्यास स्मारक दिसणार देखील नाही. त्यामुळे या स्मारकाचे महत्त्व कमी तर होणार नाही ना? अशी शंका बेळगावकरांतून व्यक्त होत आहे. अधिकाऱ्यांनी हुतात्मा स्मारकाच्या बाजूला असणाऱ्या खुल्या जागेत हा आरओ प्लांट उभारावा.









