आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत : शेतकऱ्यांसह वाहनधारकांमध्ये समाधान
वार्ताहर /उचगाव
बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील सुळगा (हिं.) गावाशेजारील जीर्ण अवस्थेत असलेल्या केंबाळी नाल्यावरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पुलाचे काम पूर्णत्वाला गेल्याने आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. सदर पुलाच्या बांधकामासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर झाला होता. बेळगाव-वेंगुर्ले हा महत्त्वाचा महामार्ग असून कर्नाटक-महाराष्ट्र अशा दोन राज्यांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. याचमार्गे गोवा राज्यात जाण्यासाठीसुद्धा याच मार्गाचा आधार प्रवासीवर्गाला घ्यावा लागतो. या मार्गावरील सुळगा (हिं.) जवळील केंबाळी नाल्यावरील पूल जीर्ण अवस्थेत होता. गेल्या अनेक वर्षापासून या पुलाच्या दुरुस्तीची मागणी प्रवासी तसेच नागरिकांतून करण्यात येत होती. पुलाच्या खालील बाजूचा बराचसा भाग ढासळला होता. पूल कधी धोका देईल आणि मोठा अपघात होईल याची चिंता प्रवासीवर्गाला लागली होती.
या पुलाच्या बांधकामाचे काम हाती घेण्यात आले नव्हते. मात्र सध्या हा पूल मोडकळीलाच आल्याने केव्हाही कोसळू शकतो. याची जाणीव सार्वजनिक बांधकाम खात्याला झाल्याने या पुलासाठी शासनाकडून अडीच कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. सदर पुलाच्या बांधकामाचे काम हाती घेण्यात आले. आणि अवघ्या सहा महिन्यांमध्ये या संपूर्ण पुलाचे काम तातडीने पूर्ण करून या पावसाळ्यापूर्वीच सदर रस्ता आता प्रवासीवर्गासाठी खुला करण्यात येणार आहे. पुलाच्या शेजारून वाहतुकीसाठी मार्ग बनविण्यात आला होता. याचमार्गे बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील संपूर्ण वाहतूक गेले सहा महिने सुरू होती. अनेक वेळेला शेजारून गेलेल्या रस्त्यावरती रहदारीची कोंडी झाल्याचे चित्र पहावयास मिळत होते. मात्र आता ही कोंडी दूर झाली असून अवघ्या काही दिवसातच सदर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती ठेकेदाराने दिली आहे. सदर नाल्यावरील पुलातून पाण्याचा निचरा पावसाळ्यात महापूर आल्यानंतर होत नसे. त्यामुळे नाल्याच्या परिसरातील जमीन, शेतातील पिके पाण्याखाली जात होती. मात्र आता पुलाची उंची व रुंदी वाढवल्याने आता पुलाच्या खालून पाण्याचा निचरा सहजगतीने होणार आहे. महापुराचा होणारा धोकाही आता टळणार असल्याचेही शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.









