आठ-दहा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद : नदीत पाणी असूनदेखील नगरपंचायतीचे दुर्लक्ष : शहरवासियांतून तीव्र नाराजी
खानापूर : नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे खानापूर शहराचा पाणीपुरवठा कोलमडला आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा बंद झाला असून नागरिकांना कूपनलिकेच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. नदीत पाणी उपलब्ध असतानादेखील नगरपंचायतीकडून पाणीपुरवठा करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याने शहरवासियांतून नाराजी व्यक्त होत आहे. खानापूर शहराजवळून वाहणाऱ्या मलप्रभा नदीच्या काठावर जॅकवेल उभारुन तेथून पाणी उपसा करून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. यापूर्वी या ठिकाणी जुना पूल होता. या पुलाच्या बंधाऱ्यात फळ्या घालून पाणी अडवले जात होते. मात्र पुलाची उंची कमी असल्याने मार्च महिन्यानंतर पाणीपुरवठा एक दिवसाआड करण्यात येत होता. तर मे महिन्यात दोन किंवा तीन दिवसानंतर पाणीपुरवठा होत होता. जुन्या बंधाऱ्यामुळे पाणी साठवणूक क्षमता कमी असल्याने जुना पूल ते जॅकवेलपर्यंत पाण्याचा कमी साठा होत होता. यापूर्वी मे महिन्यात पाणीपुरवठा करण्यासाठी जॅकवेलपर्यंत नदीतून पाणी आणण्यासाठी प्रयत्न केले जात होते. यासाठी हत्तीगुंडा, चौदामुशी येथील कोंडीतून जॅकवेलपर्यंत पाईपलाईनद्वारे पाणी आणण्यात येत होते. त्यासाठी तत्कालीन नगरसेवक, नगरपंचायतीचे अधिकारी प्रयत्न करत होते.
हत्तीगुंड्यात महिनाभर पुरेल इतके पाणी
यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासून आतापर्यंत पाऊस न झाल्याने नदीपात्र कोरडे पडले आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या जॅवकेलजवळ पाणी शिल्लक नसल्याने शहराचा पाणीपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. जॅकवेलपासून जवळच हत्तीगुंडा येथे मोठ्या कोंडीत मुबलक पाणीसाठा आहे. नगरपंचायतीने जर या ठिकाणाहून पाणी उपसा करून जॅकवेलपर्यंत आणल्यास पुढील महिनाभर पुरेल इतके पाणी या ठिकाणी आहे. मात्र नगरपंचायतीच्या प्रशासनाकडून कोणतेच प्रयत्न करण्यात येत नाहीत. तसेच नगरसेवकांकडूनही याबाबत प्रयत्न होणे गरजेचे होते. त्यांचेही याबाबत अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने शहराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्याधिकारीही असमर्थ
सध्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा कालावधी संपला आहे. आणि नगरपंचायतीवर गेल्या पंधरा दिवसांपासून प्रशासकाची नेमणूक झाली आहे. मात्र नगरसेवकाचे अधिकारी असतानादेखील शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी कोणीच लक्ष घालत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता नदीतून जॅकवेलपर्यंत पाणी आणण्यासाठी जो खर्च लागतो. तो मंजूर करण्यास मुख्याधिकारी तयार नाहीत. जून महिना आहे. पावसाला सुरुवात होईल आणि नदीत पाणी आल्यानंतर पाणीपुरवठा सुरू करू, अशा बेजबाबदारपणाची उत्तरे मुख्याधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहेत. सध्या पावसाची लक्षणे दिसत नसल्याने पाऊस लांबण्याची चिन्हे आहेत. तसेच मोठा पाऊस झाला तरी नदीतून पाणी वाहण्यास आठ-दहा दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा पावसावरच अवलंबून राहिल्यास निश्चित शहरवासियांचे हाल होणार आहेत. मुख्याधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा कळस झाला असून नगरसेवकांनी आपली जबाबदारी झटकल्याने शहरातील माजी नगरसेवक तसेच काही ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पाऊस लांबण्याची चिन्हे आहेत. यासाठी नगरपंचायतीने आणि प्रशासकानी तातडीने मलप्रभा नदीतील उपलब्ध असलेला पाणीसाठ्याचा उपसा करून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, यासाठी तातडीने नियोजन करणे करणे गरजेचे आहे.
शहरातील पाणी नियोजनाकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष
शहरात अडीचशे कूपनलिका आहेत. या कूपनलिकेवर शहराचा पाणीप्रश्न मार्गी लागलेला आहे. मात्र याबाबत नगरपंचायतीचे कोणतेही नियोजन नाही. गल्लोगल्ली असलेल्या कूपनलिकेतून लोक थेट पाईप लावून पाणी वापरत आहेत. याबाबत जर नगरपंचायतीने योग्य नियोजन करून गल्लीतील प्रत्येक कूपनलिकेच्या आधारे त्या त्या गल्लीला पाणीपुरवठा केल्यास नगरपंचायतीचा आर्थिक भारही कमी होईल, आणि पाणीपुरवठा सुलभ होईल, यासाठी नगरपंचायतीकडून योग्य नियोजन होणेच गरजेचे आहे.









