दोन जागा भाजपला : निजदचे उमेदवार सुरज नाईक सोनी जिंकता जिंकता हरले
पी. के. चापगावकर/ कारवार
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी चार मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. केवळ दोन मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. जिल्ह्यात निजदला यावेळीही खाते उघडता आले नाही. कुमठा-होन्नावर मतदारसंघातील निजदचे उमेदवार सूरज नाईक सोनी जिंकता जिंकता हरले. आप पक्षाच्या उमेदवारांचा निवडणुकीत धुव्वा उडाला आहे. हल्याळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी भाजपचे उमेदवार सुनील हेगडे यांचा पराभव केला. या मतदारसंघातून निजदचे उमेदवार निवडणूक लढविलेले माजी विधानपरिषद सदस्य श्रीकांत घोटणेकर यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

भटकळ मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आणि माजी आमदार मंकाळू वैद्य यांनी भाजपचे उमेदवार आणि आमदार सुनील नाईक यांचा पराभव केला. निजदचे उमेदवार अॅड. नागेंद्र नाईक यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. शिरसी-सिद्धापूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भीमण्णा नाईक यांनी भाजपचे उमेदवार आणि विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांचा पराभव केला. गेल्या सलग सहा विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे विजयी झाली होते. तथापि, सातव्या लढतीत हेगडे यांचा भीमण्णा नाईक यांनी पराभव केला. निजदचे उमेदवार उपेंद्र पै यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. कारवार-अंकोला विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आणि माजी आमदार सतीश सैल यांनी भाजपच्या बलाढ्या उमेदवार रुपाली नाईक यांचा पराभव केला. निजदच्या उमेदवार चैत्रा कोठारकर यांच्या हाती अधिक काही न लागल्यामुळे त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार (अपक्ष) आणि माजी आमदार गंगाधर भट यांच्या हाती अनामत रक्कम गमविण्यापलीकडे काही एक लागले नाही.
यल्लापूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि मंत्री शिवराम हेब्बार यांनी आपले पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसचे उमेदवार व्ही. एस. पाटील यांचा पराभव केला. निजदचे उमेदवार नागेश नाईक यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

कुमठा होन्नावर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार दिनकर शेट्टी यांनी निजदचे अमेदवार सूरज नाईक सोनी यांचा पराभव केला. या मतदारसंघाकडून निजदला फार मोठ्या अपेक्षा होत्या. तथापि, निजदच्या सूरज नाईक यांना केवळ 658 मतफरकांनी पराभव पत्करावा लागला. काँग्रेसचे उमेदवार आणि माजी खासदार मार्गारेट अल्वा यांचे पुत्र निवेदित अल्वा यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी कुमठा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार निवेदित अल्वा यांना नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला. मार्गारेट अल्वा आपले पुत्र निवेदित यांच्याकडून मोठ्या अपेक्षा बाळगून होत्या. तथापि शेवटी त्यांच्या प्रतिष्ठेला पुत्राच्या पराभवामुळे तडे गेले आहेत. कारण अनेकांचा प्रभाव वापरून निवेदित अल्वा यांना उमेदवारी मिळवून देण्यात आली होती.
भाजपचे क्लीन स्वीपचे स्वप्नभंग
मावळत्या विधानसभेत जिल्ह्यातील 6 आमदारांपैकी 5 आमदार भाजपचे होते. हल्याळ मतदारसंघात बाजी मारून भाजपला यावेळी क्लीन स्वीप करायचे होते. त्यासाठी भाजपने फार मोठी व्यूहरचना केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी स्टार प्रचारकांच्या प्रचारसभेचे आयोजन केले होते. यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले होते. तथापि, भाजपला सहापैकी केवळ दोन जागावर समाधान मानावे लागले. इतकेच नव्हे तर अपराजीत बादशहा म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो. त्या विधानसभा अध्यक्ष आणि शिरसी मतदारसंघातील उमेदवार विश्वेश्वर हेगडे यांना धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. त्याचबरोबर भाजपला मोदी, हिंदुत्व, बजरंग दल आदी फॅक्टरचा लाभ झाला नाही हे स्पष्ट झाले.
आर. व्ही देशपांडे यांचा विक्रम
हल्याळ मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी आपण सामोरे गेलेल्या दहा निवडणुका पैकी नऊ निवडणुकामध्ये बाजी मारून एक विक्रम प्रस्थापिक केला आहे. या निवडणुकीद्वारे देशपांडे यांनी गुरु हा शेवटी गुरुच असतो हे आपले शिष्य श्रीकांत घोटणेकर आणि आपले शिष्य व्ही. डी. हेगडे यांचे पुत्र सुनील हेगडे यांना दाखवून दिले. देशपांडे यांनी ही निवडणूक आपली शेवटची असेल असे जाहीर केले होते. त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा शेवट कसा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. देशपांडे यांच्या बाजीला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण त्यांनी बाजी मारून हल्याळ मतदारसंघात कमळ फुलविण्याचे भाजपचे स्वप्न उद्ध्वस्त केले आहे.
►हल्याळ मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आर. व्ही. देशपांडे यांनी भाजपचे उमेदवार सुनील हेगडे यांचा 3 हजार 584 मतफरकांनी पराभव केला. देशपांडे यांना 56912 तर हेगडे यांना 53328 इतकी मते पडली.
►भटकळ मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मंकाळू वैद्य यांनी भाजपचे उमेदवार सुनील नाईक यांचा 32,657 मतफरकांनी पराभव केला. विजयी उमेदवार वैद्य यांना 99603 तर पराभूत उमेदवार सुनील नाईक यांना 66946 इतकी मते फडली.
►शिरसी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भीमण्णा नाईक यांना भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांचा 9067 मतफरकांनी पराभव केला. भीमण्णा नाईक यांना 76021 इतकी तर हेगडे यांना 66954 इतकी मते पडली. निजदचे उमेदवार उपेंद्र पै यांना 8988 इतकी मते पडली.
►कारवार मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सतीश सैल यांनी भाजपच्या उमेदवार रुपाली नाईक यांचा 2415 मतफरकांनी पराभव केला. सैल यांना 76305 तर रुपाली नाईक यांना 73890 मते पडली.
►यल्लापूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शिवराम हेब्बार यांनी काँग्रेसचे व्ही. एस. पाटील यांचा 3759 मतफरकांनी पराभव केला. हेब्बार यांना 73952 इतकी तर पाटील यांना 70193 इतकी मते पडली. निजदचे नागेश नाईक यांना 1630 मते मिळाली.
►कुमठा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार दिनकर शेट्टी यांनी निजदचे सूरज नाईक यांचा 623 मतांनी पराभव केला. शेट्टी यांना 58583 इतकी तर नाईक यांना 57960 इतकी मते मिळाली.
मतमोजणीची क्षणचित्रे
►सकाळी 7 वाजता कारवार डी. सी. प्रभूलिंग कवळीकट्टी यांच्या उपस्थितीत स्ट्राँगरुम उघडला.
►मतमोजणी कडक पोलीस बंदोबस्तात
►मतमोजणी शांतपूर्ण वातावरणात
►काँग्रेसची 2013 मधील निकालाची पुनरावृत्ती
►कुमठा मतदारसंघातील विजयी उमेदवाराने कमी फरकाने बाजी मारण्याची परंपरा यावेळी ही कायम
►कुमठा मतदारसंघातील अंतिम टप्प्यातील मतमोजणीत गोंधळ
►2013 मधील निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेले मंकाळू वैद्य आणि सतीश सैल यावेळी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले.
►सतीश सैल, मंकाळू वैद्य यांचे मतमोजणी केंद्रावर उशिरा आगमन
►कुमठा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार निवेदित अल्वा मतमोजणी केंद्रावर आलेच नाहीत.
►विधानपरिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुकीतील यापूर्वीची पराभवाची मालिका काँग्रेसचे उमेदवार (शिरसी) भीमण्णा नाईक यांनी यावेळी खंडित केली.
►विजयी उमेदवारांच्या समर्थकाकडून जोरदार घोषणाबाजी
►पराभूत उमेदवारांच्या महिला समर्थकांना रडू आवरता आले नाही.









