राजद उपाध्यक्ष तिवारींचा दावा ः प्रारंभिक यश परंतु दिल्ली अद्याप दूर
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना प्रारंभिक यश मिळत असून देशातील दिग्गज नेते विरोधी पक्षांच्या एकजुटतेच्या त्यांच्या पुढाकाराला साथ देत आहेत. विरोधी एकजुटतेसाठी काँग्रेस पक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याकरता काँग्रेसला मोठे मन दाखवून प्रादेशिक पक्षांना विस्तार करू द्यावा लागणार आहे. नितीश कुमारांचा फॉर्म्युला काँग्रेसला मान्य असल्याचा दावा राजद उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी केला आहे.
काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढविली होती, परंतु पक्षाला एकाही जागेवर यश मिळविता आले नव्हते. याचप्रकारे उत्तरप्रदेशात 2022 च्या विधानसभा निवडणुकीत 403 जागा लढवून केवळ 2 ठिकाणी विजय मिळविला होता. तेलंगणातही काँग्रेस पक्ष अशाच प्रकारच्या स्थितीला सामोरा जात आहे. यामुळे काँग्रेसने स्वतःच्या भूमिकेत बदल करण्याची गरज असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे.
एक मॅचमेकर म्हणून नितीश कुमारांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. एक मतदारसंघ, एक उमेदवार अशा फॉर्म्युला त्यांना सादर केला असून काँग्रेसने त्याला मान्यता दर्शविली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधींनी नितीश कुमारांसोबत चर्चा केली आहे. नितीश यांच्या प्रस्तावाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही होकार दर्शविला आहे. या सर्व नेत्यांना एका व्यासपीठावर आणण्याची कामगिरी नितीश कुमारांना करावी लागणर आहे. एक जागा, एक उमेदवार फॉर्म्युल्यावर सर्वसंमती तयार करणे आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळविण्याचे आव्हान असल्याचे तिवारी म्हणाले.
देशाचा सर्वात चांगला चाणक्य कोण हे सध्या ठरविता येणार नाही. अमित शाह हे प्रभावशाली छोटे पक्ष आणि नेत्यांना भाजपमध्ये आणण्यास कशाप्रकारे सुक्ष्म स्तरावर काम करतात हे प्रत्येकाला माहित आहे. विरोधी पक्षांना एकजूट करणे, लोकांच्या समर्थनाला मतांमध्ये रुपांतरित करणे आणि महाआघाडीच्या मतांमधील विभागणी कमीत कमी करण्यास नितीश कुमार किती यशस्वी होतात यावर ते चाणक्य आहेत की नाही हे ठरणार असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे.









