तळघरांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता : महापालिका अधिकाऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती
बेळगाव : तळघरांमध्ये व्यवसाय सुरू करण्याचा परवाना देण्याचे ठरविण्यात आले तरी त्यामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. तळघरांमध्ये पार्किंगसाठी जागा राखीव ठेवण्यात आली होती. मात्र त्याच ठिकाणी जर व्यवसाय थाटले तर पार्किंग नेमके कोठे करायचे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे काही भागातीलच तळघरांतील व्यावसायिकांना परवाना देणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरामध्ये पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. असे असताना आता तळघरांतील व्यावसायिकांना परवाना देणे कितपत योग्य ठरणार, हे पहावे लागणार आहे. महापालिकेचा कर वाढविण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत, असे महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत. मात्र नियम मोडून अशाप्रकारे तळमजल्यांतील व्यावसायिकांना परवाना दिल्यास नियमांचा भंग होणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्येच आता संभ्रम निर्माण झाला असून नेमकी कोणती भूमिका घ्यायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
दरम्यान महापालिकेने तळघरांमध्ये काम करणाऱ्या व्यावसायिकांना परवाना देणार, असे यापूर्वीच स्पष्ट केले. पण त्यानंतर त्यावर महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, तसेच काही अधिकाऱ्यांनी चर्चा केली. जर अशाप्रकारे परवाना दिला तर भविष्यात गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ज्या भागामध्ये वाहतुकीची कोंडी होत नाही, त्याचबरोबर पार्किंगची समस्या नाही, त्या परिसरातील तळमजल्यांमध्ये व्यावसायिकांना व्यवसाय थाटण्यास मुभा दिली जाणार आहे. मात्र एकाला परवाना देणे आणि दुसऱ्याला नाकारणे हे देखील कठीण जाणार आहे. जर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तळमजला असेल तर त्यांना व्यवसाय करण्यास मुभा दिली नाही तर ते व्यावसायिक न्यायालयात धाव घेऊ शकतात. शहरातील प्रत्येकाला एकच नियम लागू असतो. मग आमच्यावर का अन्याय? असा प्रश्न आता उपस्थित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे एकूणच गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
तळघरांमधील पार्किंगचे काय?
रहदारीची समस्या मिटविण्यासाठी इमारतींमधील तळघरांमध्ये पार्किंग व्यवस्था करण्याची अट होती. मध्यंतरी महानगरपालिकेने इमारत पाहणीची मोहीम सुरू केली होती. मात्र ती बारगळली. शहर व उपनगरांतील अनेक इमारत मालकांनी आपले तळघर भाडेतत्त्वावर दिले आहे. यामुळे तळघरांसमोरील रस्त्यांवरच वाहने पार्किंग करण्यात येऊ लागली आहेत, असा आरोप करत काही दुकानदारांवर त्यावेळी कारवाईही करण्यात आली होती. असे असताना आता तळघरांमध्ये व्यवसाय करण्यास मुभा देणे कितपत योग्य ठरणार आहे, हे पहावे लागणार आहे. पार्किंग समस्येमुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे. विशेषकरून सणासुदीच्या काळामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे अनेक जाणकारांतून शहरातील मध्यवर्ती ठिकाणी अपार्टमेंट किंवा घरे बांधताना त्यांना पार्किंगसाठी जागा ठेवूनच परवानी देणे बंधनकारक आहे. त्यामुळे त्या नियमांचेही उल्लंघन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका कधी कोणता निर्णय घेईल, हे सांगता येत नाही. आज तळघरांमध्ये व्यवसाय थाटण्यास परवानगी दिली जाईल. मात्र कालांतराने महानगरपालिकेने आवाज उठविला व तळघरांच्या आस्थापनांवर गदा आणली तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. सध्या शहरातील काही तळघरांमध्ये व्यवसाय थाटले गेले आहेत. त्यावर अनेकजण उदरनिर्वाह करत आहेत. मात्र आता सर्वांनाच अशाप्रकारे जर परवानगी दिली तर भविष्यात पार्किंगची समस्या गंभीर बनण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बहुमजली पार्किंग इमारतीचा मुद्दा धूळखातच…
शहरातील पार्किंग समस्या सोडविण्यासाठी काही प्रमाणात महानगरपालिकेने प्रयत्न केले. मात्र त्यांना म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. शहरातील मध्यभागी असलेल्या बापट गल्ली येथे महानगरपालिकेने पार्किंग समस्या मिटविण्यासाठी बहुमजली इमारतीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, महानगरपालिकेच्या खजिन्यात पुरेसा पैसा नसल्याने तो प्रस्तावही धूळखात पडला आहे. हा प्रस्ताव 2002 साली मांडण्यात आला होता. मात्र, त्याकडे अद्यापही मनपाने कानाडोळा केला आहे. अनेक वर्षांनंतरही या प्रस्तावाबाबत गांभीर्य घेण्यात आले नाही. त्यामुळे समस्या कायम आहे. त्यासाठीही हालचाली करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील पार्किंग समस्या सोडवूनच याबाबत निर्णय घेणे योग्य ठरणार आहे.









