महालक्ष्मी ग्रुपने तातडीने कारखाना सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा : आय. आर. घाडी
खानापूर : खानापूर येथील लैला शुगर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम डिसेंबरचा दुसरा आठवडा आला तरी अद्याप सुरू झालेला नाही. याबाबत कारखान्याच्या व्यवस्थापक मंडळानेही याबाबत कोणतीही स्पष्टता केली नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मनात साशंकता निर्माण झाली आहे. महालक्ष्मी ग्रुपने तातडीने साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी केली आहे. तालुक्यात उसाचे क्षेत्रफळ फार मोठे असल्याने तालुक्यातील ऊस महाराष्ट्रासह बेळगाव जिल्ह्यातील इतर कारखान्यांना जात आहे.
तरीही तालुक्यातील शेतकरी लैला शुगर कारखान्याला मोठ्या प्रमाणात ऊस पाठवतात. मात्र लैला शुगर व्यवस्थापनाने बॉयलर दुरुस्तीच्या नावाखाली अद्याप साखर कारखान्याच्या यावर्षीच्या गळीत हंगामाला अद्याप सुऊवात केलेली नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची घालमेल वाढली आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखाना निर्माण करण्यात आला होता. मात्र, सहकारी तत्त्वावर हा कारखाना चालवण्यात अडचणी आल्याने तत्कालीन आमदार प्रल्हाद रेमाणी यांनी हा साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी दिला होता.
मात्र लैला ग्रुपने हा कारखाना गेल्या पाच वर्षांपूर्वी आमदार विठ्ठल हलगेकर संस्थापक असलेल्या महालक्ष्मी ग्रुपकडे चालवण्यासाठी सोपवला होता. पहिली चार वर्षे हा कारखाना सुरळीत चालला होता. मात्र यावर्षी बॉयलर दुरुस्तीच्या नावाखाली डिसेंबरची दहा तारीख आली तरी अद्याप साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याबाबत महालक्ष्मी ग्रुपने तातडीने साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करवा आणि शेतकऱ्यांना दिलासा देवून शेतकऱ्यांचे हीत जपावे अन्यथा शेतकऱ्यांना नुकसानीचा सामाना करवा लागेल असे मत घाडी यांनी तरुण भारतही बोलताना व्यक्त केले.









