जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विठ्ठल शिंदे यांचा सल्ला
बेळगाव : बर्ड फ्लूबाबत नागरिकांनी जागरुकता बाळगावी, बर्ड फ्लूबाबत लक्षणे आढळल्यास संबंधित रुग्णांनी जिल्हा रुग्णालयात दाखल व्हावे. याठिकाणी तज्ञ डॉक्टर असून बर्ड फ्लूबाबत तातडीने उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे, असे बिम्सचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विठ्ठल शिंदे यांनी नुकतेच पत्रकारांशी बोलताना सांगितले. शेजारील महाराष्ट्र राज्यात बर्ड फ्लूने थैमान घातले आहे. या रोगामुळे कोंबड्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असून, हा विषाणूजन्य रोग असल्याने मनुष्यावर देखील याचा परिणाम होतो.
त्यामुळे याबाबत बिम्सचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विठ्ठल शिंदे यांची पत्रकारांनी जिल्हा रुग्णालयात भेट घेऊन विचारणा केली असता ते म्हणाले, चिकन खाताना ते व्यवस्थित शिजविले पाहिजे, बर्ड फ्लूमुळे न्युमोनिया होतो. तिसरा टप्पा येण्यापूर्वीच सतर्क राहणे जरुरीचे आहे. पहिल्यांदा ताप येतो, डोळे लाल होणे, चुरचुरणे, सर्दी अशक्तपणामुळे चालता न येणे, श्वोसोच्छवासाचा त्रास जाणवल्यास संबंधितांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल व्हावे, जेणेकरून आम्हाला उपचार करणे सोप जाईल असे ते म्हणाले.
तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणे गरजेचे
लहान मुले व वृद्धांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे आढळल्यास तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणे गरजेचे आहे. सध्या जिल्ह्यात आतापर्यंत एकही बर्ड फ्लूचा रुग्ण आढळलेला नाही पण जिल्हा रुग्णालयाच्यावतीने खबरदारीच्या उपाययोजना घेण्यात आल्या असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.









