‘आयपीएल’ची आज ‘हायप्रोफाईल’ अंतिम लढत, धोनीचा संस्मरणीय निरोपाचा मनसुबा फळणार की, शुभमन गिल उधळवून लावणार ?
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
‘आयपीएल’च्या अंतिम सामन्यात आज रविवारी चेन्नई सुपर किंग्सची गांठ गुजरात टायटन्सशी पडणार असून महेंद्रसिंह धोनी त्यात जेतेपद मिळवून संस्मरणीय पद्धतीने या स्पर्धेचा निरोप घेतो की, तरुण शुभमन गिल चेन्नईला पाचवे विजेतेपद मिळवण्यापासून रोखतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

जवळपास 19 उन्हाळे आधी तऊण धोनी भारतीय संघात पाऊल ठेवत होता तेव्हा चार वर्षांचा गिल पाकिस्तानच्या सीमेवरील पंजाबच्या फाजिल्का गावातील एका विस्तीर्ण शेतजमिनीवर आजोबांनी हाताने बनवलेल्या बॅटने फलंदाजी करायचा. आज धोनीसमोर त्याच गिलचे सर्वांत मोठे आव्हान राहणार आहे. धोनी लवकरच 42 वर्षांचा होणार असून आज 1 लाख 32 हजार क्षमतेच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तो जेव्हा खेळेल तेव्हा बहुदा त्याच्या आवडत्या पिवळ्या जर्सीमध्ये मैदानात उतरण्याची त्याची ही शेवटची खेप असेल.
गिलने आतापर्यंत तीन शतकांसह 851 धावा काढलेल्या आहेत. मोटेरा येथे फलंदाजीस पोषक खेळपट्टीवर त्याला रोखण्यासाठी धोनीची रणनीती काय असेल याकडे साऱ्यांचे लक्ष राहील. धोनी यासाठी दीपक चहरच्या स्विंगचा, रवींद्र जडेजाच्या अचूक गोलंदाजीचा, ऑफ-स्टंपच्या बाहेर चेंडू टाकून झपाट्याने आंत आणणाऱ्या मोईन अलीचा की, यॉर्कर टाकणाऱ्या मथिशा पाथिरानाचा वापर करतो हे पाहावे लागणार आहे. चाकोरीबाहेरचा विचार करण्यासाठी ओळखला जाणारा कर्णधार आणि तांत्रिकदृष्ट्या अगदी अचूक फलंदाज यांच्यातील हा सामना राहणार आहे.
धोनीने पुढच्या वर्षीही खेळावे अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा असेल. पण दुखणाऱ्या डाव्या गुडघ्याने संपूर्ण हंगाम खेळलेल्या धोनीला आता ‘टी20’ची गरज पूर्ण करणे कठीण जाईल. ‘सीएसके’चा विद्यमान संच पाहता बहुतेक सामन्यांत त्याला 8 व्या क्रमांकावर फलंदाजी करणे परवडले. दुसरीकडे, गोलंदाजीचा विचार करता दीपक चहरला त्यांना स्पर्धेच्या अर्ध्या भागापर्यंत मुकावे लागले आणि त्यामुळे तुषार देशपांडेचे रूपांतर बळी मिळविणाऱ्या विश्वासार्ह गोलंदाजामध्ये करावे लागले. सातत्याच्या अभावाने ग्रासलेल्या शिवम दुबेचे रुपांतर षटकार खेचणाऱ्या फटकेबाज फलंदाजामध्ये करणे किंवा रवींद्र जडेजाचे ‘टी20’ गोलंदाज म्हणून पुनरागमन घडविणे यात धोनीचे मोलाचे योगदान राहिले आहे.
73 सामन्यांनंतर ‘आयपीएल’मधील दोन सर्वांत सातत्यपूर्ण संघ शिखर संघर्षात एकमेकांविऊद्ध उभे ठाकणार आहेत. चेन्नई सुपर किंग्सच्या बांधणीचे अनुकरण गुजरात टायटन्सइतके अन्य कोणत्याही संघाने केलले नाही. त्यांचा कर्णधार हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करण्याचा एकच मार्ग आणि तो म्हणजे ‘माही वे’ असे मानतो. फलंदाज सामने जिंकतात पण गोलंदाज स्पर्धा जिंकून देतात अशी जुनी म्हण आहे आणि गुजरात टायटन्सच्या कामगिरीचा मागोवा घेतल्यास ती त्यांना बरोबर लागू पडते. मोहम्मद शमी (28 बळी), रशिद खान (27 बळी) आणि मोहित शर्मा (24 बळी) यांनी त्यांच्या योजना बहुतेक वेळा यशस्वी केल्या आहेत.
गुजरात टायटन्सतर्फे गिलच्या 851 धावांनंतर सर्वात जास्त धावा करणारा दुसरा फलंदाज हा कर्णधार हार्दिक पंड्या (325 धावा) आहे. त्यांच्यात 500 पेक्षा जास्त धावांचा फरक आहे. पण चांगल्या गोलंदाजीमुळे त्यांच्या फलंदाजीतील त्रुटी झाकून गेल्या आहेत. यष्टिरक्षक वृद्धिमान साहाला 16 डावांत केवळ एकच अर्धशतक झळकावता आलेले असूनही संघ व्यवस्थापनाने त्याला बदलण्याचा कधी विचार केलेला नाही. धोनी याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करेल. जर ते गिलला लवकर बाद करू शकले तर त्यांनी अर्धी बाजी जिंकल्यासारखे होईल. कारण गुजरातच्या इतर कोणत्याही फलंदाजाने कठोर संघर्ष करण्याची क्षमता दाखवलेली नाही आणि गुजरातच्या गोलंदाजांना जर काही करामत करून दाखवायची असेल, तर त्यांना योग्य धावसंख्येचा आधार लागेल.
धोनीच्या नेतृत्वाखाली अजिंक्य रहाणे (13 सामन्यांत 299 धावा, दोन अर्धशतके) आणि शिवम दुबे या खेळाडूंनी या मोसमात आपले स्थान जसे निर्माण केले त्याचप्रमाणे श्रीलंकेचा मथिशा पाथिराना (15 सामन्यांत 17 बळी), भारतातर्फे अजून न खेळलेला तुषार देशपांडे (15 सामन्यांमध्ये 21 बळी) यांनीही आपले अस्तित्व ठळकपणे दाखविण्यात यश मिळविले. ‘सीएसके’च्या फलंदाजीत डेव्हॉन कॉनवे (15 सामन्यांत 625 धावा, सहा अर्धशतके) आणि ऋतुराज गायकवाड (15 सामन्यांत 564 धावा, चार अर्धशतके) यांनी वेळोवेळी संघाला चांगली सुऊवात करून दिलेली आहे. फटकेबाज दुबे (15 सामन्यांत 386 धावा, तीन अर्धशतके) हा 33 षटकारांसह सर्वाधिक षटकार खेचणाऱ्यांच्या यादीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत गिलचाही समावेश आहे. आज कोणाचे पारडे जड ठरेल हे सांगणे कठीण असून ‘आयपीएल’च्या इतिहासातील सर्वोत्तम अंतिम सामन्यांपैकी एक मात्र तो निश्चित ठरू शकतो.
संघ : गुजरात टायटन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, रशिद खान, राहुल तेवतिया, विजय शंकर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, यश दयाल, प्रदीप सांगवान, दर्शन नळकांडे, जयंत यादव, आर. साई किशोर, नूर अहमद, दासून शनाका, ओडियन स्मिथ, के. एस. भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, जोशुआ लिटल आणि मोहित शर्मा.
चेन्नई सुपर किंग्स : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू, मोईन अली, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, सिसांडा मगाला, शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, अजय मंडल, निशांत सिंधू, राजवर्धन हंगरगेकर, मिशेल सेंटनर, सुभ्रांशू सेनापती, सिमरजित सिंग, मथिशा पाथिराना, महेश थिक्षाना, भगत वर्मा, प्रशांत सोळंकी, शेख रशिद, तुषार देशपांडे.









