प्रतिनिधी/ बेळगाव
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील गनिमीकावा, धाडस, साहस आणि थरार यांचे देखावे सादर करून शहापूर विभागातील चित्ररथ मंडळांनी साऱ्यांचेच लक्ष वेधले. या चित्ररथ देखाव्यांमुळे संपूर्ण शहापूर परिसर शिवमय झाला होता. बालचमूंसह महिलांनी आणि तरुणांनी सादर केलेले देखावे पाहून साऱ्यांच्याच डोळ्यांचे पारणे फेडले.
शहापूर परिसरातील विविध मंडळांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील अनेक प्रसंग हुबेहूब सादर करून अक्षरश: शिवशाही अवतरली होती. ही भव्य मिरवणूक पाहण्यासाठी शिवप्रेमी नागरिकांनी एकच गर्दी केली. शहापूर मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, नगरसेवक रवी साळुंखे, सेक्रेटरी श्रीकांत कदम, माजी उपमहापौर संजय शिंदे, पी. जे. घाडी, माजी नगरसेवक राजू बिर्जे, विजय भोसले, अमृत भाकोजी, हिरालाल चव्हाण, दशरथ शिंदे, सतीश शिंदे, श्रीधर जाधव, अशोक चिंडक, श्रीकांत प्रभू, दिलीप दळवी यांच्या हस्ते चित्ररथ मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले.

श्रीकांत कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शहापूर मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव यांनी शहापूर परिसरातील मिरवणुकीसंदर्भात माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून शहापूर परिसरातील उत्सव मंडळांना प्रोत्साहन देऊन अत्यंत शिस्तबद्धरित्या मिरवणूक काढली जाते, असे त्यांनी सांगितले. आलेल्या प्रत्येक शिवजयंती उत्सव मंडळाच्या चित्ररथ देखाव्याचे स्वागत करण्यात येत होते.
पहिली गल्ली-भारतनगर, नेताजी सुभाषचंद्र युवक मंडळाने छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील अत्याचार प्रसंगाच्या देखाव्याचे सादरीकरण केले. छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला आपण मृत्यूलाही घाबरत नाही, हे दाखवून दिले. याचे सादरीकरण करून साऱ्यांचीच वाहव्वा मिळविली. छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांच्यावर केलेले अत्याचार या सादरीकरणातून दाखविले. हा प्रसंग पाहून साऱ्यांच्या अंगावर शहारे आले. या मंडळाच्या देखाव्यासमोर महिलांसह तरुणांनी ढोल-ताशा पथक व ध्वजपथकाने कला सादर केली.

होसूर येथील मराठा युवक मंडळाने स्वराज्याचे पहिले तोरण हा देखावा सादर करून साऱ्यांचीच मने जिंकली. केवळ चार दिवसांमध्ये त्यांनी ही सर्व तयारी करून अत्यंत आकर्षक असा देखावा सादर केला. माजी नगरसेविका सुधा भातकांडे, मंडळाचे अध्यक्ष जोतिबा शहापूरकर, प्रशांत भातकांडे आणि इतर कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेऊन स्वराज्याचे पहिले तोरण हा देखावा सादर केला. यामध्ये मराठमोळ्या गीतांसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या सवंगड्यांचा सहभाग होता. यामुळे या देखाव्याचे अनेकांनी कौतुक केले.
ओमकार तरुण मित्र मंडळ, पवार गल्ली, शहापूर या मंडळाने अफझलखानाचा वध हा देखावा सादर केला. बालचमूंनी हा देखावा सादर केल्याने साऱ्यांनीच त्यांचे कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराज तसेच अफझलखान यांच्यातील भेटीचा प्रसंग व त्यानंतर वधाचा प्रसंग पाहून साऱ्यांनीच टाळ्यांचा गजर केला.

चौथा क्रॉस भारतनगर, शहापूर येथील युवक मंडळानेही धर्मवीर संभाजी महाराज यांच्या कैदेचा प्रसंग दाखविला. आकर्षक अशी वेशभूषा करून या देखाव्यातील प्रत्येक पात्राने साऱ्यांची मने जिंकली. देखावा सादर करताना त्यांनी ध्वनीसंवाद उत्तमरितीने सादर केला.
कचेरी गल्ली, शहापूर येथील श्री शिवसम्राट युवक मंडळाने शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याचा प्रसंग दाखविला. वेळ व उत्तम सादरीकरण यामुळे त्यांनी गर्दी खेचून घेतली होती. एका ट्रकच्या ट्रॉलीवरच हा देखावा सादर केला. मात्र हुबेहुब चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे देखावा सादर करून साऱ्यांची मने जिंकली. हट्टीहोळी गल्ली-शहापूर येथील एकता युवक मंडळाने जगदीश्वराचे दर्शन घेण्याचा देखावा सादर केला.









