वृत्तसंस्था /नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरमधील भारतविरोधी दहशतवाद आणि हिंसाचाराला अर्थसाहाय्य पुरविल्याप्रकणी राष्ट्रीय सुरक्षा प्राधिकारणाने (एनआयए) आरोपपत्र सादर केले आहे. खुर्रम परवेझ हा मुख्य सूत्रधार असून इरफान मेहराझ, गुलाम हसन आणि इतर आरोपींची नावे या आरोपपत्रात आहेत. हसन हा हिजबुल मुजाहिद्दिन या दहशतवादी संघटनेचा हस्तक असल्याची माहिती देण्यात आली आहे. या आरोपींनी जम्मू-काश्मीरमधील विविध फुटीरतावादी, हिंसाचारी आणि दहशतवादी संघटनांना या भागात हाहाकार माजविण्यासाठी पैसा आणि शस्त्रे पुरविण्याचा कट रचला होता. हे अर्थसाहाय्य पुरविण्यासाठी बिगर सरकारी संस्था, विश्वस्त संस्था, सहकारी संस्था आणि समाजकल्याण संघटनांचे साहाय्य घेण्यात येत होते. अशा संस्था स्थापन करुन त्यांच्या माध्यमातून दहशतवाद्यांना गुप्तपणे पैसा पुरविण्याची योजना होती, असे आरोपपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. तीन आरोपींपैकी हसन हा बेपत्ता असून त्याला फरार घोषित करण्यात आले आहे. तो हिजबुल मुजाहिद्दिन या इस्लामी संघटनेचा हस्तक असून तो युनायटेड जेहाद कौन्सिल या संघटनेचाही सदस्य आहे. तो पाकिस्तानमध्ये पळून गेला असावा, अशी शंका आहे. त्याचा शोध सुरु आहे, ही माहिती देण्यात आली.
विविध संस्थांची स्थापना
या दहशतवाद्यांनी हिंसाचाराला अर्थसाहाय्य देण्यासाठी जम्मू-काश्मीर कोएलेशन ऑफ सिव्हील सोसायटीज आणि तत्सम संस्थांची स्थापना केली होती. या संस्था पैशाचे संगलन करुन दहशतवाद्यांना पैसा पुरवित होत्या. हा पैसा सामाजिक कामांसाठी दिल्याचे भासवले जात होते. प्रत्यक्षात तो दहशतवादासाठी दिला जात होता, असे एनआयएने आपल्या आरोपपत्रात कागदपत्रांसह स्पष्ट केले आहे.









