मल्लिकार्जुन विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण, माजी विद्यार्थ्यांचा सत्कार, स्मरणिकेचे प्रकाशन
काणकोण : चार रस्ता, काणकोण येथील सेंत्रु प्रोमोतोर द इस्त्रुसांव या शैक्षणिक संस्थेच्या शतकमहोत्सवाचा थाटात समारोप करण्यात आला. यावेळी विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर उभारलेला आसनावर आरूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, शताब्दी स्तंभ आणि 100 वर्षांपूर्वीच्या शाळा स्थापनेवेळचे तैलचित्र यांचे सभापती रमेश तवडकर, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. भगवा ध्वज व शिवकालीन पोषाख परिधान केलेले संस्थेचे चालक, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी तसेच प्रवेशद्वाराजवळ शिवकालीन परिस्थितीचे दर्शन घडविणारे मावळे, ढोल-ताशे, लेझीम, पोवाडागायन व सुयश देसाई यांच्याकडून झालेले ‘मृत्युंजय संभाजी’ या नाट्याप्रवेशाचे सादरीकरण यामुळे एक वेगळेच वातावरण या ठिकाणी निर्माण झाले. 25 डिसेंबरपासून या सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला होता.
मागच्या 100 वर्षांत विद्यालयात शिकून गेलेल्या आणि विविध क्षेत्रांत चमकलेल्या 150 पेक्षा अधिक माजी विद्यार्थ्यांचा या चार दिवसांत सत्कार करण्यात आला. समारोपाच्या दिनी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले ईशस्तवन आणि शाळेच्या इतिहासाचे वर्णन करणाऱ्या पोवाड्याने उपस्थित पालक, माजी विद्यार्थी आणि आमंत्रितांना गत काळात नेले. व्यासपीठावर सभापती तवडकर, समाजकल्याणमंत्री फळदेसाई, खास निमंत्रित काणकोणचे नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर, ज्ञानप्रबोधिनी मंडळाचे अध्यक्ष चेतन देसाई, श्री मल्लिकार्जुन श्री. चेतन मंजू देसाई महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. मनोज कामत, संस्थेचे अध्यक्ष शांबा देसाई, आमसभेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई उपस्थित होते. त्याशिवाय कोषाध्यक्ष रमेश कोमरपंत, स्मरणिका समितीचे प्रमुख कमलाकर म्हाळशी, पुंडलिक गावकर, सर्वानंद भगत, अचिकेत गावकर, विनोद सावंत, प्रेमानंद गावकर, बाबुसो गावकर, सम्राट भगत, प्रतिभा गणे, मुख्याध्यापिका वर्षा ना. गावकर, वर्षा नाईक, प्राचार्य विहार देसाई, कृष्णराव गावकर, नागेश कोमरंपत, सुचेंद्र देसाई, अनिल फळदेसाइ, गौरीश भैरेली, सतीश देसाई, राम देसाई हेही हजर होते.
माजी विद्यार्थ्यांचा सन्मान
यानिमित्ताने मल्लिकार्जुन विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यात निवृत्त कस्टम अधिकारी कोस्तांव फर्नांडिस, डॉ. बाबुराव देसाई, सुभाष सावंत देसाई, मनोज देसाई, कृष्णराव ना. गावकर, आनंदू गणे देसाई, नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर, डॉ. सोमनाथ कोमरपंत, स्व. यशवंत नाईक, साहित्यिक कमलाकर म्हाळशी, माजी मुख्याध्यापक सुरेंद्र राणे, आदर्श शेतकरी बाबू कोमरपंत, स्व. गोविंद सावंत, निवृत्त कार्यकारी अभियंता गोपीनाथ देसाई, पत्रकार संजय कोमरपंत, कोकण रेल्वेचे अभियंते अभय धुरी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र देसाई, सदानंद देसाई, माजी अध्यक्ष अनिल का. देसाई यांचा समावेश राहिला.
त्याशिवाय विद्यार्थी प्रतिनिधी अपेक्षा बोळणेकर, करण पागी आणि आदर्श शिक्षिका म्हणून शामिया शेख यांचा गौरव करण्यात आला. सत्कारमूर्तींच्या वतीने डॉ. बाबुराव देसाई, संजय कोमरपंत, डॉ. सोमनाथ कोमरपंत, संदेश गावकर यांनी मनोगत मांडले. सूत्रसंचालन मनोज ना. गावकर यांनी केले. शांबा देसाई यांनी स्वागत केले, तर वर्षा ना. गावकर, वर्षा नाईक, विहार देसाई यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले. शिक्षक नेल्विन फर्नांडिस आणि कांचन बोळणेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
स्मरणिकेचे प्रकाशन
शतकमहोत्सवानिमित्त तयार केलेल्या स्मरणिकेचे यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या स्मरणिकेसंबंधीची माहिती कमलाकर म्हाळशी यांनी दिली. प्रमुख वक्ते डॉ. मनोज कामत यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनचा इतिहास कथन करताना ज्या संस्थापकांनी योगदान दिले त्यांची माहिती दिली. सभापती रमेश तवडकर, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, चेतन देसाई त्याचप्रमाणे नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर यांनी आपल्या भाषणात मुक्तीपूर्व काळातील काणकोणची शैक्षणिक स्थिती आणि त्या काळातील समाजधुरीण व शिक्षणप्रेमींची दूरदृष्टी यावर प्रकाश टाकला आणि विद्यमान संस्थाचालकांचे कौतुक केले. राजेंद्र देसाई यांनी आभार मानले.









