प्रतिनिधी/ पणजी
समस्त हिंदू धर्मियांच्या मोठ्या आस्थेचा आणि आदिशक्तीच्या उपासनेचा उत्सव म्हणजे शारदीय नवरात्रोत्सव आज रविवार 15 ऑक्टोबरपासून घटस्थापनेने सुरू होत आहे. नवरात्रोत्सव नऊ दिवस म्हणजे 23 ऑक्टोबरपर्यंत चालणार असून दुसऱ्या दिवशी दसरा साजरा करण्यात येणार आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त राज्यभर भरगच्च पारंपरिक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नऊही दिवशी कीर्तन करणे हे गोव्यातील नवरात्रोत्सवाचे वैशिष्ट्या असून त्यासाठी गोव्यातील तसेच महाराष्ट्राच्या अनेक भागातील कीर्तनकारांना आमंत्रित केले जाते. देवीचा मखरोत्सव हे सुद्धा गोव्यातील नवरात्रोत्सवाचे वैशिष्ट्या आहे, मखरोत्सवाचा हा सुंदर सोहळा अंत्रुज महालात म्हणजे फोंड्यात अधिक प्रमाणात पहायला मिळतो.
नवत्रोत्सवाच्या दिवसांत विद्येची देवता श्री सरस्वती पूजन करणे ही गोव्याची परंपरा आहे. अनेक विद्यालयांमध्ये तसेच मंदिरांमध्ये आणि काही ठिकाणी सार्वजनिक मंडळांतर्फेही सरस्वती पूजन मोठ्या भक्तीभावाने साजरे केले जाते.
गुजरातचे सांस्कृतिक संचित असलेला गरबा-दांडियाही गोव्याने आत्मसात केला असून त्याच्या अनेक ठिकाणी स्पर्धाही आयोजित करुन आकर्षक बक्षिसे दिली जातात.









