प्रवाशांची गर्दी : बस चालक-वाहकांना सूचना : शक्ती योजनेमुळे सार्वजनिक बससेवेवर अतिरिक्त ताण
बेळगाव : परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी शहरातील विविध बसथांब्यांना भेट देऊन प्रवाशांची गैरसोय समजून घेतली. तसेच बेजबाबदारपणे बस चालविणाऱ्या चालक आणि वाहकांनाही समज दिली. शक्ती योजनेमुळे सार्वजनिक बससेवेवर अतिरिक्त ताण वाढला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीमुळे परिवहनच्या अधिकाऱ्यांनी विविध बसथांब्यांना भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. परिवहनच्या ताफ्यात बसेसचा तुटवडा असल्यामुळे विविध मार्गांवर बसफेऱ्यांची कमतरता जाणवू लागली आहे. दरम्यान, प्रवाशांना तासन्तास ताटकळत थांबावे लागत आहे. किंवा जीव धोक्यात घालून प्रवासाला सामोरे जावे लागत आहे.
तर काही वेळेला बसचालक आणि वाहक बेधडकपणे बस चालवत असल्याचे प्रकारही समोर येत आहेत. तर काही वेळेला बसचालक बस स्टँडवर बस न थांबवताच पुढे जाऊन थांबवत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. विशेषत: बसच्या पाठीमागे धावताना चेंगराचेंगरीत अपघातही घडू लागले आहेत. यासह अनेक तक्रारी बसबाबत वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहनच्या अधिकाऱ्यांनी गर्दी होणाऱ्या बसथांब्यांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. मात्र केवळ एक दिवस पाहणी करून समस्या सुटणार नाही. प्रत्यक्षात बसेसची संख्या कमी असल्याने दररोज प्रवासी आणि विद्यार्थ्यांना धोकादायक प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. यासाठी कायमस्वरुपी समस्या मार्गी लावावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
परिवहन अधिकाऱ्यांकडून सर्व्हे
बससेवेवर प्रवाशांचा अतिरिक्त ताण वाढल्याने बसथांब्यावर न थांबवताच पुढे हाकल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना ताटकळतच थांबावे लागत आहे. बसेस फुल्ल होऊन धावत असल्याने बसचालक व वाहक मनमानीपणे बसला थांबा देत आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. याबाबत प्रवाशांनी परिवहनकडे तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर परिवहन अधिकाऱ्यांकडून गर्दी होणाऱ्या बसथांब्यांचा सर्व्हे करण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांनी काही बसेस थांबवून बसचालक व वाहकांनाही सूचना केल्या.









