बेळगावातील परिस्थिती : गणेशोत्सवातही अघोषित वीज कपातीचा फटका, नागरिकांतून संताप
बेळगाव : गणेशोत्सवाला सुरुवात झाली आणि ग्रामीण भागातील नागरिकांना व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अघोषित वीज कपातीचा फटका बसत आहे. तालुक्यातील परिस्थितीमुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. हेस्कॉमने वीज कपात बंद करून सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. काँग्रेसने पाच गॅरंटी योजना जाहीर केल्या आहेत. त्यामधील महत्त्वाची योजना म्हणजे गृहज्योती योजना सरकारकडून लागू करण्यात आली. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. असे असले तरी गृहज्योतीचा भार सोसेना आणि सुरळीत वीजपुरवठा होईना, अशी अवस्था निर्माण झाली आहे. गणेशोत्सवापूर्वी शहराबरोबरच ग्रामीण भागातही दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र आताही अशीच अवस्था निर्माण झाली आहे. अघोषित वीजपुरवठा वारंवार करण्यात येत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांना फटका बसत आहे. लागवड केलेल्या पिकांमध्ये पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. जर पाणी सोडले नाही तर पिके वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र थ्रीफेज वीजपुरवठा वारंवार खंडित करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सरकार एकीकडे मोफत वीजपुरवठा म्हणून जाहीर करते अन् दिवसांतून 10 ते 15 वेळा अघोषित वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. परिणामी शेतकऱ्यांबरोबरच छोटेखानी उद्योग-व्यवसाय करणाऱ्यांनाही याचा त्रास होत आहे. त्यामुळे याबाबत हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
सरकार जाणूनबुजून करत आहे का?
निरंतर वीजपुरवठा योजनेसाठी निवड झालेल्या गावांमध्येही वारंवार वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. वीज बिल माफ झाले. मात्र पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे सरकार जाणूनबुजून हे करत आहे का? अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. ग्रामीण भागात मात्र अघोषित वीजपुरवठा दिवसेंदिवस वाढत आहे. यावर्षी पाऊस कमी पडला आहे. मात्र त्याचा परिणाम वीजपुरवठ्यावर होण्याचे कारण नाही. दरम्यान आतापर्यंत तरी पावसाने चांगली साथ दिली आहे. मात्र काही गावांमध्ये नेमण्यात आलेले कर्मचारी आपल्या फायद्यासाठी वीजपुरवठा खंडित करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.









