वृत्तसंस्था/ योकोहामा (जपान)
येथे रविवारी झालेल्या सेको गोल्डन ग्रा प्रि आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताची महिला अॅथलिट 19 वर्षीय शैली सिंगने महिलांच्या लांब उडी प्रकारात कांस्यपदक पटकाविले.
या स्पर्धेत शैली सिंगने महिलांच्या लांब उडी प्रकारातील 6.65 मी. चे अंतर नोंदवित कांस्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात जर्मनीच्या मेरीसी लुझोलोने 6.79 मी. चे अंतर नोंदवित सुवर्णपदक तर ऑस्ट्रेलियाच्या ब्रुकी बुश्चेकुहेलने 6.77 मी. चे अंतर नोंदवित रौप्यपदक पटकाविले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये शैली सिंगने पहिल्यांदाच पदक मिळविल्याबद्दल तिचे अभिनंदन होत आहे. भारताची माजी महिला अॅथलिट अंजू बॉबी जॉर्ज ही शैली सिंगची आदर्श असून भविष्यकाळात तिच्यासारखी दर्जेदार कामगिरी करण्याकरीता शैली सिंगचे प्रयत्न राहतील. अंजू बॉबी जॉर्जने 2004 साली झालेल्या जपानमधील या स्पर्धेत महिलांच्या लांब उडीत सुवर्णपदक पटकाविले होते. बेंगळूरमधील साईच्या केंद्रामध्ये शैली सिंग प्रशिक्षक रॉबर्ट बॉबी जॉर्ज यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत. 2021 साली. झालेल्या 20 वर्षाखालील वयोगटाच्या विश्व अॅथलेटिक्स स्पर्धेत शैली सिंगने महिलांच्या लांब उडीत रौप्यपदक मिळविताना 6.59 मी. चे अंतर नोंदविले होते. गेल्या फेब्रुवारीमध्ये नूर सुल्तान येथे झालेल्या आशियाई इनडोअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत शैली सिंगला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.









