आगामी पाच वर्षात ऑटोमेटिव्ह तंत्रज्ञान व डिजिटल मोबिलिटीत गुंतवणूक होण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी पाच वर्षांमध्ये भारतात बॉश लिमिटेड ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान आणि डिजिटल मोबिलिट आदी क्षेत्रात जवळपास 200 कोटी रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक करणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
वाहनांचे सुट्टेपार्ट बनविणारी प्रमुख कंपनी बॉश यांचे व्यवस्थापकीय संचालक सौमित्र भट्टाचार्य यांनी आर्थिक वर्ष 2021-22 च्या वार्षिक अहवालादरम्यान समभागधारकांना ही बाब सांगितली आहे. भट्टाचार्य जे बॉश समूह इंडियाचे अध्यक्षही आहेत, त्यांनी म्हटले आहे, की मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2022-23 च्या दरम्यान दोन अंकांची वृद्धी प्राप्त करणार असल्याचे संकेत व्यक्त केले आहेत.
जगभरामध्ये पुरवठा साखळीसारख्या समस्येला सगळय़ांनाच तोंड द्यावे लागत असून यासोबत चिपची कमतरता, चीनमधील लॉकडाऊन, रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्धजन्य स्थितीमुळे राजकीय क्षेत्रात झालेले बदल याचा वाहन क्षेत्रावर प्रभाव राहिल्याचे दिसून आले.
व्याजदरावर झालेले परिणाम व मंदीच्या प्रवासात अर्थव्यवस्था ढकलली जाण्याची शक्यता याचाही काहीसा दबाव विविध उद्योगावर झाल्याचे दिसून आले.
भविष्यातील योजना
आम्ही भविष्याकरीता गुंतवणूक करत असून यामध्ये बॉश लिमिटेड आगामी पाच वर्षांच्या दरम्यान विकसित ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान व डिजिटल मोबिलिटी क्षेत्रात भारतामध्ये 200 कोटी रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक करणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
कंपनी जागतिक पातळीवरील कठिण स्थितीचा सामना करण्यास तयार असून मजबूत ऑर्डरसह इलेक्ट्रोमोबिलिटीमध्ये एक मजबूत साखळी तयार करणार आहे.









