गर्भाशयाशिवाय अर्भकाचा जन्म होऊ शकत नाही याची आपल्याला माहिती आहे. तथापि, काही महिलांना जन्मजात गर्भाशयच नसतो. त्या महिला कधीही अपत्यांना जन्म देऊ शकत नाहीत, असा आजवरच समज होता. तथापि, आता ही समजूत खोटी ठरण्याची वेळ आली आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या लीझ गोन्झाल्विस यांना गर्भाशय नसल्याने त्या अपत्यांना जन्म देण्यास अकार्यक्षम मानल्या गेल्या. तथापि, आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमुळे आता त्यांना माता बनण्याचे सुख मिळणार आहे. गर्भाशय नसतानाही त्यांना अपत्यप्राप्ती होणार आहे.

बालपणीच त्यांना त्यांच्या या शारिरीक त्रुटीसंबंधीची कल्पना देण्यात आली होती. आपण कधीच माता बनू शकणार नाही, हे त्यांनी मनोमन जाणले होते. तथापि, नंतर त्यांना स्वीडन देशात एका महिलेचे गर्भप्रत्यारोपण यशस्वी झाल्याचे वृत्त समजले. नंतर अमेरिकेतील अल्बामा प्रांतातही अशी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे त्यांना कळले. त्यानंतर त्यांनीही अशा गर्भधारणेसाठी आवेदनपत्र सादर केले. आता त्यांच्यावर ही गर्भप्रत्यारोपणाची प्रक्रिया करण्यात आली आहे.
गर्भाशय नसलेल्या महिलांचे सर्वसाधारण प्रमाण 5 हजार महिलांमध्ये 1 असे असते. अशा महिलांना मूल व्हायचे असेल तर त्यांना त्यांच्या रक्तगटाशी जुळेल असा गर्भाशय ‘भाड्याने’ घ्यावा लागतो. त्यांची कोणी नातेवाईक महिला असा आपल्या गर्भाशयात त्यांचे मूल वाढवू शकते. गर्भाशय नसलेल्या महिलांचे स्त्रीबीज आणि त्यांच्या पतीचे पुरुषबीज यांचा संयोग दोघांच्याही शरीराबाहेर केला जातो आणि त्यातून निर्माण झालेला गर्भ अन्य महिलेच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केला जातो. तेथे त्याची वाढ होऊन ती महिला त्या अर्भकाला जन्म देते. ही प्रक्रिया तशी जटील असली तरी कालांतराने ती सर्वत्र उपलब्ध होण्याची शक्यता आहे. साधारणत: टेस्टट्यूब बेबी ज्याला म्हणतात तशी पण काहीशी वेगळी अशी ही प्रक्रिया आहे. ज्यामुळे गर्भाशय विहीन महिलांना त्यांचे स्वत:चे अपत्य मिळू शकते.









