बेळगाव : बेळगाव-दिल्ली विमानफेरी अखेर गुरुवारपासून सुरू झाली. बेळगावमधून देशाच्या राजधानीला आता अवघ्या अडीच तासांमध्ये प्रवाशांना पोहोचता येईल. गुरुवारी वॉटर सॅल्युट देऊन दिल्लीवरून आलेल्या विमानाचे स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी विमानफेरीला तुफान प्रतिसाद मिळाला. मागील वर्षभरापासून बंद असलेली बेळगाव-दिल्ली विमानफेरी अनेक प्रयत्नांनंतर पुन्हा सुरू झाली. खासदार मंगला अंगडी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, कर्नाटक राज्य सरकारचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी, आमदार राजू सेठ यांच्या उपस्थितीत या विमानफेरीचा शुभारंभ झाला. दिल्लीहून बेळगावला आलेल्या प्रवाशांचे विशेष स्वागत करण्यात आले. विमानतळ संचालक त्यागराजन यांनी विमानफेरी सुरू करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या मेहनतीची माहिती दिली. केवळ बेळगावच नाही तर हुबळी, कोल्हापूर, सांगली या परिसरातील प्रवाशांना दिल्लीला पोहोचणे आता सहज शक्य होईल. यावेळी इंडिगोचे पायलट अक्षय पाटील, विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य संजय भंडारी, इराण्णा दयाण्णावर, अनुप साठे, गुरुदेव पाटील, प्रियांका हजारे, ज्योती कट्टी, शरद पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आयएनएस यंत्रणेचा शुभारंभ
विमान उतरताना खराब हवामान असेल अथवा कमी दृश्यमानता असेल तर विमान उतरताना अनेक अडचणी येतात. या अडचणींवर मात करण्यासाठी बेळगाव विमानतळावर आयएनएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून या यंत्रणेची चाचणी सुरू होती. अखेर गुरुवारपासून आयएनएस यंत्रणा बेळगाव विमानतळावर कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे विमान प्रवाशांना या दोन मुख्य सुविधा प्राप्त झाल्या आहेत.









