मंदिराला प्राचीन कदंबकालीन कलाकृतीसह धार्मिक महत्त्व
वार्ताहर/हलशी
नंदगड गावच्या सुमारे 3 कि. मी. अंतरावर दक्षिण दिशेला नयनरम्य निसर्गाच्या कुशीत असलेले प्राचीन कदंबकालीन भगवान शिवाचे प्रशस्त श्री तट्टेश्वर मंदिर नंदगडच्या पर्यटन वैभवात भर घालणारा कदंबकालीन स्थापत्यकलेचा वेगळा आविष्कार आहे. हलशी परिसरातील देवस्थाने ही पुरातत्त्व खात्याच्या आधीन आहेत. त्यामुळे या मंदिरांची देखभाल आणि डागडुजी पुरातत्त्व खात्यानेच करणे गरजेचे आहे. मात्र पुरातत्त्व खात्याने या मंदिरांच्या देखभालीकडे साफ दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून आणि पर्यटकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नंदगडपासून तीन कि. मी. दूरवर अगदी घनदाट जंगलात अकाराव्या शतकात कदंबांनी उभारलेले तट्टेश्वर मंदिर आजही इतिहासाची साक्ष म्हणून उभे आहे. मंदिर संपूर्ण दगडात बांधकाम केलेले आहे. मंदिरात प्रवेश करताच समोर नंदी आहे. मंदिरावर दगडी छत आहे. तसेच पूर्वेस दोन शिवलिंग आहेत. पश्चिमेस नवग्रह देवता आणि महिषासुर मर्दिनीच्या मूर्ती आहेत. दक्षिणेला श्री गणेश व श्री वीरभद्र यांचे विग्रह आहेत. तसेच गाभाऱ्यात महादेवाचे स्वयंभू शिवलिंग आहे आणि मंदिराला कळस आहे. मंदिराची रचना ही शिवलीलामृत ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे आहे. मंदिराच्या छतावर समोरील बाजूस कदंबांच्या राज्य मुद्रेचे शिल्प कोरलेले आहे. त्यामुळे कदंबांची राज्य वैभवाची साक्ष देते.
नंदगड गावातील धार्मिक कार्य, ग्रामदेवता यात्राकाळात या मंदिरामध्ये याम पूजा केली जाते. श्रावण सोमवार, कार्तिक मास आणि महाशिवरात्र या काळात येथे भाविकांची गर्दी असते. तसेच पर्यटकांना हे स्थान आकर्षित करत असते. मंदिराची योग्य देखभाल होत नसल्याने मंदिराच्या छतातून पाणी गळत आहे. तसेच मंदिर परिसरात विद्युत पुरवठ्याची सोय नसल्याने अंधाराचा सामना करावा लागत आहे. या मंदिराकडे जाण्यासाठी रस्त्याची सोय नसल्याने पर्यटकांना पावसात चिखलातून रस्ता काढत जावे लागते. यासाठी मंदिरापर्यंत पक्क्या रस्त्याची सोय होणे गरजेचे आहे. हजारो वर्षाचा इतिहास लाभलेल्या मंदिराचे जतन करावे, पुरातत्त्व खात्याने तातडीने या मंदिराच्या देखभालीसाठी नियोजन करण्यात यावे, अशी मागणी पर्यटक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पुजाऱ्याची नेमणूक करा
मंदिरातील देवदेवतांची पूजा, अर्चा फक्त सणावारालाच होत असल्याने या ठिकाणी पुजाऱ्याची नेमणूक करून रोज पूजेची सोय करावी, तसेच पर्यटकांसाठी कायमस्वरुपी पाण्याची सोय करावी, संपूर्ण मंदिराची डागडुजी करून मंदिराची देखभाल करणे गरजेचे आहे.









