1994 च्या तुकडीच्या आयएफएस अधिकारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय विदेश सेवेच्या अधिकारी वाणी सर्राजु राव यांना इटलीतील भारताच्या नव्या राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. वाणी राव या सध्या विदेश मंत्रालयात अतिरिक्त सचिव पदावर कार्यरत आहेत. वाणी राव या लवकरच राजदूतपदाचा कार्यभार सांभाळतील अशी अपेक्षा असल्याचे विदेश मंत्रालयाने शुक्रवारी म्हटले आहे.
वाणी सर्राजु राव या 1994 च्या तुकडीच्या आयएफएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्या फिनलंड आणि एस्टोनियामध्ये देखील भारताच्या राजदूत राहिल्या आहेत. राव यांनी यापूर्वी संयुक्त सचिव (अनिवासी भारतीय विषयक) म्हणूनही काम पाहिले आहे. अनिवासी भारतीयांशी संबंधित अनेक कार्यक्रमांचे आयोजन त्यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे.
जानेवारी 2015 पासून जुलै 2017 पर्यंत त्या इंडिया डेव्हलपमेंट फौंडेशन ऑफ ओव्हरसीज इंडियन्सच्या (आयडीएफ-ओआय) त्या सीईओ देखील राहिल्या आहेत. आयडीइफ-ओआय भारतात प्रमुख कार्यक्रम आणि सामाजिक तसेच विकास प्रकल्पांसाठी अनिवासी भारतीयांच्या सहकार्याची सुविधा प्रदान करते.
वाणी सर्राजु राव यांनी 2011-14 पर्यंत तेल अवीव (इस्रायल)मध्ये भारतीय दूतावासात मिशनच्या उपप्रमुख आणि वाणिज्यिक शाखेच्या प्रमुख म्हणूनही काम केले आहे. त्यांची पहिली नियुक्ती मेक्सिको सिटीतील भारतीय दूतावासात झाली होती.
वाणी राव यांनी हैदराबाद विद्यापीठातून राजशास्त्रात एमए पूर्ण पेले आहे. तर अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील सेन जोस स्टेट युनिव्हर्सिटीमधून पर्यावरण अध्ययनात एम.एस. केले आहे. तेलगू, हिंदी, इंग्रजी आणि स्पॅनिश भाषा त्यांना अवगत आहे.









