इस्त्रायलच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा अरब जगतात वेगवेगळ्या भाषा ऐकायला मिळत आहेत. संयुक्त अरब अमिराती आणि बहरीनने इस्त्रायलला मवाळ भाषेत सुनावले तर सौदी अरेबिया आणि इजिप्तची भाषा त्याहून वेगळी असली तरी कुवेत, कतार, ओमान, येमेन, इराण आदी राष्ट्रांपेक्षा नरमाईचीच म्हणावी लागेल. दुसरीकडे युरोपियन युनियनने पॅलेस्टाईनला देण्यात येणारी मदत कायम ठेवण्यात येणार असल्याचे म्हटले तरी काही सदस्य देशांनी त्याला आक्षेप घेतलेला आहे.
हमास या पॅलेस्टाईन सरकार पुरस्कृत दहशतवादी संघटनेने शनिवार 7 ऑक्टोबर रोजी केवळ 20 मिनिटांत पाच हजार अग्निबाण डागून इस्त्रायलच्या कथित अभेद्य सुरक्षा कवचाला भेदून तेथे हाहाकार माजवला. हमासच्या शेकडो दहशतवाद्यांनी इस्त्रायलमध्ये नंगानाच चालविला. तेथील बायकां पोरांना अमानुषपणे मारून जगाला आपल्या अमानवतेचे दर्शन घडविले. शेकडो इस्त्रायली नागरिकांना ओलिस धरले. हमासच्या या क्षणिक हल्ल्याने संपूर्ण जग अवाक झाले. इस्त्रायल म्हणजे एक अभेद्य किल्ला असल्याचे समजले जात असायचे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलच्या सैन्यात आणि राजकीय वर्तुळात काही काळ हाहाकार माजला होता. हमासच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलने चोविस तासांच्या आत युद्धाची घोषणा करत पॅलेस्टाईनवर जोरदार हल्ले चढविले असून त्यात अमेरिकेने थेट सहभाग घेतलेला आहे. तर हमासच्या बाजूने केवळ लेबेनॉन, सिरीया आणि इराण पुरस्कृत दहशतवादी संघटना कार्यरत आहेत. इस्त्रायलने सध्या हमासचे कंबरडे तोडलेले आहे. मात्र इस्त्रायलला त्याच्या पारंपारिक मित्रराष्ट्र असलेल्या युरोपातून नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे.
पॅलेस्टाईनने पारंपारिक मित्रदेश अर्थात आखाती देशांची सहानुभूती यावेळी गमावलेली आहे. मुस्लिम जगताचा मसिहा म्हणवणाऱ्या सौदी अरेबियाने इस्त्रायलला कोणत्याही प्रकारचा इशारा देण्यापासून स्वत:ला रोखलेले आहे. यापूर्वीच्या चार युद्धात बहुतांश सर्व अरब राष्ट्रांनी इस्त्रायलबरोबर पंगा घेतलेला होता. इजिप्त, सौदी अरेबिया, लेबेनॉन, जॉर्डन, सिरीया, इराण, इराक आदी देशांनी इस्त्रायलबरोबर प्रत्येक युद्धात दोन हात केले होते. यावेळी लेबनन आणि सिरीया वगळता पॅलेस्टाईनचे हे सर्व मित्र देश आपल्या देशहिताचा विचार करत सावधपणे पावले टाकत आहेत.

पॅलेस्टाईनच्या भूमीबद्दल या देशांना पूर्ण सहानुभूती असून त्याकडे तडजोड करण्यास हे देश तयार नसले, तरी हमासच्या हल्याचे समर्थन करण्यास त्यांनी टाळाटाळ चालविली आहे. हमासचे समर्थन म्हणजे दहशतवादाचे समर्थन असे मानले जाणार असल्याने सद्यस्थितीत अनेक मुस्लिम देश इस्त्रायलवरील हल्ल्याचे समर्थन करण्यास कचरत आहे. अमेरिकेने यापूर्वी सौदी अरेबियाला दहशतवादाला खतपाणी घालणारा देश म्हणून घोषित केले होते.
सौदीबरोबर तुर्कस्तान सरकारनेही इस्त्रायल हमास युद्धावर भाष्य करण्यात विशेष आस्था दाखविलेली नाही. हमास या पॅलेस्टाईनस्थित दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यामुळे इस्त्रायलच्या आयर्न डोम ही क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली विफल ठरली. सध्या जगभरात हाच चर्चेचा विषय बनलेला आहे. मात्र हमासच्या हल्ल्यामुळे पॅलेस्टाईनसंदर्भात असलेली युरोपियन व जगातील बऱ्याच देशांची सहानुभूती गमावून नाराजी ओढवून घेतलेली आहे.
हमासने रॉकेट हल्ले केल्यानंतर युरोपियन युनियनच्या अधिकाऱ्याने पॅलेस्टाईनला देण्यात येणारा 732 दशलक्ष डॉलर्सचा विकास निधी रोखण्याची घोषणा सोशल मीडियावरून करण्यात आली. अर्थातच 27 देशांच्या या संघटनेत हल्लकल्लोळ माजला. पॅलेस्टाईनचा विकास निधी थांबविण्याच्या निर्णयाबद्दल अनभिज्ञता दर्शवित स्पेन, नेदरलँड, आर्यलँड, लक्झंबर्ग आदी देशांनी मदत थांबविण्यास आपला तीव्र आक्षेप दर्शविला.
इस्त्रायल आणि त्याच्या मित्रराष्ट्रांकडून युरोपियन युनियनकडून देण्यात येणारा निधी हमासकडे जात असल्याचा आरोप केला होता. त्याला अनुसरून विकास निधी हाताळणाऱ्या अधिकाऱ्याने सदर निधी रोखण्याची घोषणा केली होती. मात्र सदर अधिकाऱ्यावर सदर वक्तव्य मागे घेण्यास युरोपियन युनियनच्या सदस्य देशांनी भाग पाडले. तसेच सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची तत्काळ बैठक बोलावून युरोपियन युनियनच्या पॅलेस्टाईनला देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीशी सध्याच्या घडामोडीचा कोणत्याही प्रकारचा संबंध लावण्यात येऊ नये असे स्पष्ट करण्यात आले. या घटनेवरून इस्त्रायलला अमेरिका आणि ब्रिटनचा बिनशर्त पाठिंबा असला तरी युरोपियन युनियनमध्ये त्याला विरोध करणारेही आहेत.
इस्त्रायल सरकारने हमासला नेस्तनाबूत करण्यासाठी गाजापट्टीवर जोरदार हल्ले सुरु असून जगभरातून होत असलेल्या टीकेला भीक न घालता आपली पूर्ण ताकत लावलेली आहे. 1948 ते 1980 पर्यंतच्या चार युद्धात इस्त्रायलला संपूर्ण युरोप आणि अमेरिकेचा पाठिंबा मिळत असे. पण यावेळी केवळ अमेरिका आणि ब्रिटनच्या नेत्यांनी इस्त्रायलला भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला. फ्रान्ससारखा देश यावेळी तटस्थ राहिलेला आहे. तर युरोपातील काही देशांत इस्त्रायल विरोधात जगजाहीर बोलले जातआहे.
हमास आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असलेल्या युद्धानंतर अमेरिकेप्रमाणे एकही अरब देश हमासच्या बाजूने उभा राहिलेला नाही. मागील चार युद्धात जगातील मुस्लिम देश नेमाने पॅलेस्टाईनच्या बाजूने उभे ठाकत असत. यंदाच्या वर्षीचे हे युद्ध केवळ इस्त्रायल आणि हमास यांच्या पुरतेच मर्यादित राहिलेले असून व्यापक युद्धाची चिन्हे अजून तरी दिसत नसली तरी ती पूर्णपणे नाकारता येत नाहीत.
प्रशांत कामत








