सर्व आदेश काटेकोरपणे पाळण्याचा ‘सर्वोच्च’ आदेश, प्रकरण बंद केल्याची घोषणा
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
लोकांची दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्या प्रकरणी योगगुरु रामदेवबाबा यांच्या पतंजली कंपनीने केलेली क्षमायाचना सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. तसेच आता हे प्रकरण बंद झाल्याची घोषणाही केली आहे. मात्र, या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत, त्याचे काटेकोरपणे पालन करावे, असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने या कंपनीला मंगळवारी दिला आहे.
पतंजलीवर आपल्या उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहीराती प्रसिद्ध केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करण्यात आल्या होत्या. न्यायालयाने या जाहीराती तत्काळ बंद करण्याचा आदेश या कंपनीला दिला होता. तथापि कंपनीने पुन्हा तशा जाहिराती प्रसिद्ध केल्याने सर्वोच्च न्यायालयात न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याची याचिका सादर करण्यात आली होती. त्यामुळे कंपनीचे सीईओ आचार्य बाळकृष्ण आणि संचालक रामदेवबाबा यांना न्यायालयाने प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा आदेश दिला होता.
विनाअट क्षमायाचना
कंपनीने सर्वोच्च न्यायालयात प्रथम एक क्षमायाचना पत्र सादर केले होते. तथापि, न्यायालयाने ते स्वीकारले नाही. त्यानंतर पुन्हा कंपनीने दुसरे क्षमायाचनापत्र सादर केले. ते योग्य असल्याने न्यायालयाकडून त्याचा स्वीकार झाला. त्यामुळे न्यायालयाने आपल्यापुढील प्रकरण आता बंद केले आहे.
कंपनीला आदेश
जरी कंपनीने प्रथम सशर्त क्षमापत्र सादर केले होते आणि ते न्यायालयाने नाकारले होते, तरी कंपनीची नंतरची वर्तणूक योग्य असल्याने दुसऱ्या क्षमापत्राचा आम्ही स्वीकार करीत आहोत. मधल्या काळात कंपनीने आपल्या वर्तणुकीत न्यायालयाला अपेक्षित सुधारणा केल्याने कंपनीविरोधात कारवाई करण्याचा आदेश देण्यात आलेला नाही. कंपनीने आपल्या उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहीराती किंवा वक्तव्ये दिली जाणार नाहीत, असे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्याचप्रमाणे न्यायालयानेही कंपनीला भविष्यातील वर्तणुकीसंबंधी मार्गदर्शक आदेश दिले आहेत. कंपनीने भविष्यात आपले प्रतिज्ञापत्र आणि न्यायालयाचे आदेश यांचे काटेकोरपणे आणि बिनचूक पालन केले पाहिजे. तसे न केल्यास कंपनीवर कारवाई करण्याचा आदेश द्यावा लागेल, असेही या प्रकरणाच्या न्यायपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
कंपनीने कोणती चूक केली ?
कोरोनाच्या उद्रेकाच्या काळात पतंजली कंपनीने कोरोना बरा करणारे औषध बाजारात आणल्याचे प्रतिपादन केले होते. या औषधाला सरकारची मान्यता असलयाचेही जाहीरातीत स्पष्ट करण्यात आले होते. तथापि, अशी मान्यता या औषधाला देण्यात आली नव्हती. त्यामुळे कंपनीची जाहीरात दिशाभूल करणारी आहे, असा निष्कर्ष न्यायालयात काढण्यात आला. तसेच कंपनीचे संचालक रामदेव बाबा यांच्या काही वक्तव्यांवरुनी मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेण्यात आले होते. मात्र आता त्यावर पडदा पडला आहे. मात्र, भविष्यात पतंजली कंपनीला सावध रहावे लागणार आहे आणि आपल्या उत्पादनांच्या जाहीराती करताना नियमांचे पालन करावे लागणार आहे.
पतंजलीला दिलासा
ड कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश न दिल्याने कंपनीला दिलासा
ड यापुढे नियमाप्रमाणे वागण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा कंपनीला आदेश
ड क्षमायाचना पत्र सादर केल्यानंतर कंपनीच्या वर्तणुकीत झाली सुधारणा
ड पहिले क्षमायाचना पत्र न्यायालयाने नाकारल्यानंतर दुसरे पत्र सादर









