बागपत येथील आश्रमात पोहोचला डेरा प्रमुख : शिष्या हनीप्रीत सोबत
वृत्तसंस्था/ बागपत
हरियाणाच्या रोहतक तुरुगांत शिक्षा भोगत असलेला डेरा प्रमुख गुरमीत राम रहिम सातव्यांदा फर्लोवर तुरुंगातून बाहेर पडला आहे. मंगळवारी सकाळी तो शिष्या हनीप्रीत अणि परिवाराच्या सदस्यांसोबत बागपत येथील बरनावा आश्रमात पोहोचला. यावेळी आश्रमाच्या प्रवेशद्वारावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बलात्कार आणि हत्येप्रकरणी गुरमीत राम रहिमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने ऑगस्ट 2017 मध्ये राम रहिमला दोषी ठरविले होते. बागपत येथील आश्रमात सध्या अनुयायांना आत जाण्याची अनुमती देण्यात आलेली नाही. राम रहिमला 21 दिवसांचा फर्लो मिळाला आहे. यादरम्यान तो याच आश्रमात राहणार आहे.
यापूर्वी 6 वेळा राम रहिम फरलोवर सुनारिया तुरुंगातून बाहेर आला होता आणि दरवेळी तो बागपत येथील आश्रमात जात राहिला आहे. फेब्रुवारी महिन्यात उच्च न्यायालयाने अनुमतीशिवाय डेरा सच्चा सौदा प्रमुखाला यापुढे पॅरोल देऊ नये असा निर्देश हरियाणा सरकारला दिला होता. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने याचिकेद्वारे राम रहिमची अस्थायी मुक्तता करण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते.









