भारतीय मुष्टियोद्धा अमित पांघलने पुरुषांच्या फ्लायवेट 51 किलोग्रॅम वजनगटात उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित करत आपल्या मोहिमेला जोरदार सुरुवात केली. वर्ल्ड चॅम्पियनशिप रौप्यजेता पांघलने नॅम्री बेरीला एकतर्फी फरकाने मात देत आगेकूच केली.
फिदरवेट बॉक्सर मोहम्मद हुसामुद्दिनने बांगलादेशच्या सलीम हुसेनविरुद्ध राऊंड ऑफ 16 मध्ये 5-0 असा एकतर्फी विजय नोंदवला. यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये निराशा केलेल्या पांघलने त्यानंतर एखाद्या मोठय़ा स्पर्धेत भाग घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सागर अहलावतही उपांत्यपूर्व फेरीत
युवा सागर अहलावतने देखील आपल्या गटातून उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. शिवा थापासह सुमित कुंदूचे आव्हान मात्र शेवटच्या 16 मध्ये संपुष्टात आले. 92 किलो गटात पदार्पण करत असलेल्या सागरने कॅमेरुनच्या मॅक्झिमे येगनोंग निजेयोला 5-0 असे नमवले.









