केळी, नारळ, सुपारी, आंबा, भाजी उत्पादन धोक्यात : आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आमदार डॉ देविया राणे यांनी दखल घेण्याची मागणी
वाळपई : रानटी जनावरांच्या उपद्रवामुळे तालुक्यातील कृषी उत्पादक उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. हातातोंडाशी आलेली पिके हिरावून घेतली जात आहेत. यामुळे गेल्या दहा वर्षांपासून रानटी जनावरांचा बंदोबस्त करून त्यांना उपद्रवी घोषित करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने केली जात आहे. मात्र सरकार पूर्णपणे डोळेझाक करीत असल्याचा आरोप सत्तरी तालुक्यातील कृषी उत्पादकांकडून केला आहे. तालुक्याती दोन्ही आमदारांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान माकडाकडून मोठ्या प्रमाणात नारळाचे नासाडी होऊ लागलेली आहे. यामुळे निराश बनलेल्या नारळ उत्पादकांनी माड बागायतीची निगा राखणे सोडून दिलेले आहे. यामुळे आगामी काळात सत्तरी तालुक्यातून नारळाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात माकडांचा उच्छाद नारळाच्या झाडांना उध्वस्त करीत आहे. यामुळे माकडांना उपद्रवी घोषित करावी अशी मागणी नारळ उत्पादकांनी केलेली आहे. माकडा प्रमाणेच शेकरू सुद्धा शेतीउत्पादनाची नासाडी असल्याच्या तक्रारी वाढल्या आहे. नारळाप्रमाणे केळी बागायतीवर मोठ्या प्रमाणात रानटी जनावरांचा उपद्रव वाढू लागलेला आहे.
रानडुकरांकडूनही नुकसानी
रानडुकरांकडून मोठ्या प्रमाणात भाजीची व इतर लागवडीची नाशाडी होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे केळीची मोठ्या प्रमाणात नुकसानी करण्यात येत आहे. रानडुकरांना मारण्याची परवानगी सरकारने देण्याची मागणी होत आहे.
सत्तरीच्या दोन्ही आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष.
सत्तऊ तालुक्यातील वाळपई मतदारसंघाचे आमदार विश्वजीत राणे व पर्ये मतदार संघाचे आमदार डॉ. देविया राणे या सध्या भाजप पक्षाच्या सरकारचा महत्त्वाचा भाग आहे. शेतकरी बांधवांचे अस्तित्व नष्ट झाल्यास सत्तरी तालुक्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत होण्याची भीती आहे. महत्त्वाचे म्हणजे विश्वजीत राणे यांच्याकडे वन खात्याचा ताबा आहे. त्यामुळे त्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. त्याचप्रमाणे सत्तरी तालुक्यासह राज्यस्तरावरील भावनिक प्रश्नांबाबत विधानसभेत भूमिका मांडणाऱ्या पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे यांनी हा प्रश्न आपल्या हातात घेऊन सरकारचे लक्ष वेधावे, अशी मागणी कृषी उत्पादकांनी केलेली आहे.









