संगमेश्वरनगरात भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक, पती जखमी
प्रतिनिधी/ बेळगाव
भरधाव कंटेनरने दुचाकीला ठोकरल्याने संगमेश्वरनगर सर्कलजवळ शनिवारी दुपारी झालेल्या अपघातात शिक्षिकेचा मृत्यू झाला. तर पती जखमी झाले आहेत. वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. अलतगा येथील लक्ष्मीयात्रेहून घरी परतताना ही घटना घडली आहे.
छाया शिवानंद भिसे (वय 60) मूळच्या राहणार अष्टे-चंदगड, ता. बेळगाव सध्या राहणार रामदेव गल्ली, बेळगाव असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी शिक्षिकेचे नाव आहे. पती शिवानंद भिसे (वय 67) हे जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
छाया या कणबर्गी येथील एसएसआरडी हायस्कूलमध्ये शिक्षिका होत्या. दोन महिन्यात त्या सेवानिवृत्त होणार होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रविवार दि. 30 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता अष्टे-चंदगड, ता. बेळगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
घटनेची माहिती समजताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त शेखर एच. टी., वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक एन. सी. काडदेवर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छाया व शिवानंद हे दाम्पत्य होंडा अॅक्टिव्हावरून अलतगा यात्रेला गेले होते. लक्ष्मी यात्रेहून बेळगावला येताना संगमेश्वरनगर सर्कलजवळ भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक बसली. या अपघातात शिक्षिकेचा मृत्यू झाला.