पणजी : ’ज्याचे स्मरण होते त्याला कधीच मरण येत नाही’, असे म्हणतात. संजीव वेरेकर यांच्याबद्दल हे वाक्य तंतोतंत लागू पडते. त्यांचे अनेकांशी मतभेद होते, मनभेद मात्र कुणाशीच नव्हते, अशा शब्दात प्रसिद्ध कवी, साहित्यिक, पत्रकार संजीव वेरेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पणजीतील मिनेझीस ब्रागांझा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित या शोकसभेस वेरेकर यांचे आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी बोलताना ज्येष्ठ नाट्याकलाकार अजित केरकर यांनी, वेरेकर यांचे जीवन ’सारंगी’ प्रमाणे होते, असे सांगितले. सारंगी कितीही तुटली, मोडली तरी तिच्यातील सांगितिक वलय कधीच संपत नाही, तोच अनुभव वेरेकर यांच्याबाबतीत दिसून येतो. अशा व्यक्ती आज दुर्मिळ होत चालल्या आहेत, असे ते म्हणाले. या सभेत गोरख मांद्रेकर, अन्वेषा सिंगबाळ, काशिनाथ नाईक, सुहासिनी प्रभुगावकर, विनायक गोवेकर, आनंद वाघुर्मेकर, अंजू साखरदांडे, मिलन वायंगणकर, गौरेश वेर्णेकर, राजू भिकारो नाईक, बबन भगत आदींनी वेरेकर यांच्याबद्दलच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यांची कन्या स्नेहा वेरेकर यांनी वडिलांच्या आठवणी सांगितल्या तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले. आपल्या वडिलांनी समाजसुधारणेसाठी केलेले कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी सर्वांनी एक मिनीट शांतता पाळून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली वाहिली. मुकेश थळी यांनी सुत्रसंचालन केले.
Previous Articleआगामी लोकोत्सवात कीर्तनासाठी खास दिवस
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









