300 खेळाडूंना प्रशिक्षण-70 फिडे मानांकन खेळाडू-मॅराथॉन स्पर्धेतही सहभाग
नरेश कृष्णा गावणेकर/फोंडा
कोणत्याही खेळात खेळाडूंच्या यशात प्रशिक्षकांचे बहुमूल्य योगदान असते. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच खेळाडू उच्चस्तर गाठतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केलेले अनेक बुद्धिबळ खेळाडू गोव्यात असून त्यांना घडविणारे तेवढेच उत्कृष्ट प्रशिक्षकही आहेत. यापैकी फोंड्यातील अमोघ सतीश नमशीकर हे एक असून युवा खेळाडू घडविण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे. आजपर्यंत त्यांनी 300 खेळाडूंना प्रशिक्षित केले असून त्यामध्ये 70 फिडे मानांकन खेळाडूंचा समावेश आहे. त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत गोवा राज्याचे प्रतिनिधीत्व केले आहे.
इंजिनिअर ते बुद्धिबळ प्रशिक्षक
सिव्हिल इंजिनिअरींगची पदवी मिळविलेले अमोघ नमशीकर हे आरसीसी कन्सल्टंट आहे. आपला हा व्यावसाय सांभाळूनही ते बुद्धिबळ खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी झटत आहेत. 2008 साली त्यांनी खडपाबांध-फोंडा येथे बुद्धिबळ प्रशिक्षण वर्गाला सुरुवात केली. यासाठी त्याला त्याचे कुटुंबीय व गोवा बुद्धिबळ संघटनेचा पाठींबा मिळाला. प्रशिक्षण वर्गाला नवशिक्या तसेच प्रगत खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यानंतर त्यांनी हायस्कूलमध्ये प्रशिक्षण शिबिरे घेण्यास सुरुवात केली. वागळे हायस्कूल मंगेशी, एसआरएस वेदिक मॅथमेटिक्स अकादमी, जीव्हीएम प्रगती विद्यालय, स्वामी विवेकानंद हायस्कूल बोरी, श्रीमती आनंदीबाई म. नाईक हायस्कूल करंजाळे, लोकविश्वास प्रतिष्ठानचे मूकबधीर स्कूल, मातृछाया बालकल्याण आश्रम तसेच श्रीकृष्णमंदिर कुर्टी, जनशक्ती वेलफेअर असोसिएशन, लायन्स क्लब ऑफ फोंडा, मांगिरीश युथ क्लब मंगेशी व इतर एनजीओच्या सोबत फोंडा तालुका बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने शिबिरे घेऊन मुलांना बुद्धिबळचे धडे दिले. बुद्धिबळ क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना फोंडा तालुका बुद्धिबळ संघटना, दिवंगत माजी आमदार लवू मामलेदार, लायन साईश लवंदे, सारस्वत स्पोर्ट्स संघ चेरिटेबल ट्रस्टतर्फे सन्मानीत करण्यात आले आहे.
उत्कृष्ट खेळाडू व संयोजक
अमोघ यांनी लहानपणापासून बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. वडिल सतीश नमशीकर हे एक उत्कृष्ट क्रीडापटू असल्याने त्यांचा त्यांना पाठींबा मिळाला. राज्य पातळीवरील आंतर उच्च माध्यमिक बुद्धिबळ स्पर्धेत तो जीव्हीएम उच्च माध्यमिक संघासाठी खेळला. विजयवाडा येथे झालेल्या राष्ट्रीय 25 वर्षांखालील स्पर्धेत त्याने गोवा संघाचे प्रतिनिधीत्व केले. दिंडीगुल, नागपूर, पुणे, कारवार, सांगली व मुंबई येथे झालेल्या फिडे मानांकन स्पर्धेत त्याने सहभाग घेतला. 2007 साली त्याने क्लासिकल प्रकारात फिडे मानांकन प्राप्त केले. त्याचबरोबर रॅपिड व ब्लिट्झ प्रकारातही त्याने फिडे मानांकन मिळविले आहे. अखिल गोवा बुद्धिबळ स्पर्धेत त्याने अनेक मुख्य पारितोषिके पटकावली आहे. याशिवाय लायन्स सद्भावना रॅपिड स्पर्धेत अजिंक्यपद प्राप्त केले आहे. अमोघ हे फोंडा तालुका बुद्धिबळ संघटनेचे सचिव असून एक उत्कृष्ट स्पर्धा आयोजक आहेत. फोंडा तालुका बुद्धिबळ संघटना, गोवा बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशन व फिडेचे मार्गदर्शन व सहकार्याने त्यांनी दिव्यांग मुलांसाठी, फोंडा तालुका, राज्य व राष्ट्रीय पातळीवर, फिडे मानांकन व गोवा ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.
मॅराथॉन धावपटू, टेबल टेनिस खेळाडू
बुद्धिबळ खेळाबरोबरच अमोघ हे एक उत्कृष्ट मॅराथॉन धावपटू, टेबल टेनिस व क्रिकेट खेळाडू आहेत. राज्यात व देशात होणाऱ्या अनेक मॅराथॉन स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी ती पूर्ण केली आहे. सातारा हिल रन 2016 स्पर्धेत त्याला गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड सर्टिफिकेट व एक्सलंट पर्फोरमन्स प्राप्त झाली आहे. 2017 साली नॅशनल मॅराथॉन सर्किट स्पर्धा पार केल्यामुळे दिल्ली येथे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्याला आमंत्रित केले होते. गोवा रिव्हर मॅराथॉन, टाटा मुंबई मॅराथॉन स्पर्धेत त्याने सहभाग घेतला आहे. फोंडा तालुका पातळीवरील टेबल टेनिस स्पर्धेत त्याने पाच वेळा अजिंक्यपद प्राप्त केले आहे. याशिवाय सरसांगण क्रिकेट स्पर्धा व राज्यातील इतर क्रिकेट स्पर्धेत तो खेळत आहे. 2017 साली त्याला लायन ऑफ द इयर व एक्सलंट क्लब सेक्रेटरी हा पुरस्कार मिळाला आहे.
युवा खेळाडूंनी बुद्धिबळातील टायटल्स मिळवावी
द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रघुनंदन गोखले यांनी आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरात अमोघने 2006 साली सहभाग घेतला होता. फोंडा येथील जीव्हीएम डॉ. दादा वैद्य शिक्षण महाविद्यालय, गोवा बुद्धिबळ संघटना, इंडियन चेस स्कूल व साऊथ मुंबई चेस अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चेस ट्रेनिंग डिप्लोमा त्याने मिळविला आहे. बुद्धिबळ प्रशिक्षण देण्यासाठी आपल्याला कुटुंबीयांबरोबरच हितचिंतक आशेष केणी, सागर साकोर्डेकर, राधा साकोर्डेकर, नरेश गावणेकर, डॉ. जयश्री मडकईकर, अर्चना तेंडुलकर, आनंद कुर्टीकर, गोव्याचे इतर प्रशिक्षक, नातेवाईक व मित्रमंडळी यांचे सहकार्य व पाठींबा मिळाल्याचे अमोघ सांगतात. भविष्यातही युवा खेळाडूंना बुद्धिबळ प्रशिक्षण देण्यास आपण तत्पर असेल. खेळाडूंनी समर्पित भावना, नियमित सराव व कठोर मेहनत घेऊन खेळ सुरुच ठेवावा. विविध स्पर्धेत तसेच राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन एफएम, आयएम व जीएम ही टायटल्स मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी ते खेळाडूंना प्रोत्साहित करतात.









