सध्या भारत व इंग्लंड यांच्यातील मालिकेकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं असून दुसऱ्या कसोटीत भारतानं यजमानांना लोळविल्यानंतर ती बरोबरीत आल्यानं उत्कंठता वाढलीय…मात्र या मालिकेत वापरला जाणारा लाल ‘ड्युक्स बॉल’ खूप लवकर मऊ होत असल्याचं दिसून आलेलं असून तो चर्चेचा विषय बनलाय. मऊ चेंडूमुळं फलंदाजांनी सहज धावा लुटल्याहेत असं मानलं जातंय…
- यजमान संघ आणि भारताचा कर्णधार शुभमन गिल दोघांनीही ही बाब निदर्शनास आणून दिलीय…‘खेळपट्टीपेक्षाही चेंडू खूप लवकर मऊ आणि आकारहीन होतोय. जर चेंडू करामती करत असेल, तर खेळायला मजा येते. जर तुम्हाला फक्त 20 षटकं मदतकारी ठरतील आणि नंतर उर्वरित दिवसभरात बचावात्मक खेळ करावा लागेल हे कळलेलं असेल, तर अशा परिस्थितीत खेळ त्याचा सार गमावतो’, असं गिलला म्हणावंसं वाटलंय…
- भारताचा उपकर्णधार रिषभ पंतनं देखील ‘ड्युक्स’ बॉलच्या गुणवत्तेवर टीका केलीय आणि आपण कधीही लाल चेंडूला इतक्या मोठ्या प्रमाणात खराब होताना पाहिलेलं नाही, असं मत व्यक्त केलंय…गुऊवारपासून सुरू झालेल्या लॉर्ड्स कसोटीपूर्वी पंत म्हणाला की, चेंडू ही एक मोठी समस्या बनलीय अन् ते खेळासाठी चांगलं नाही…
- ‘ड्युक्स’चा आकार बदलत असल्यानं खेळाडूंनी चेंडू बदलण्यासाठी पंचांकडे धाव घेणं ही या मालिकेतील एक नियमित घटना बनलीय..चेंडू मऊ झाल्यानंतर गोलंदाजांना त्यापासून कोणतीही मदत मिळत नाही. यामुळं फलंदाज नि गोलंदाज यांच्यातील संघर्ष नवीन चेंडूपुरता मर्यादित राहतो…
- ‘ड्युक्स’ चेंडूची शिवण आता खूपच बोथट होऊ लागलीय, अशी कुरबुर इंग्लिश क्रिकेटमध्येही चालू असून काहींना तर तो ‘कूकाबुरा’ बॉलसारखा वाटतो. ‘कूकाबुरा’ चेंडू जुना झाल्यावर शिवण सपाट होते…
- ही चिंता केवळ इंग्लिश भूमीतच नव्हे, तर इतर खंडांतही व्यक्त झालीय. कॅरिबियनमध्ये देखील ‘ड्युक्स’चा वापर केला जातो. तिथं संघांना आढळलंय की, चेंडू खूप लवकर कडकपणा गमावतो. एकेकाळी या चेंडूची शिवण, टिकाऊपणा ही मुख्य वैशिष्ट्यां होती. पण त्यांना आता ओहोटी लागलीय…
- मात्र ‘ड्युक्स’ बॉल बनवणाऱ्या कंपनीचे मालक दिलीप जाजोदिया यांच्या मते, चेंडू मऊ होण्यामागे अनेक घटक लपलेत. यंदाचं वर्ष 1976 च्या कोरड्या उन्हाळ्यासारखं. त्यावेळी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी संपूर्ण दौऱ्यात वर्चस्व गाजवलं होतं, याकडे ते लक्ष वेधतात…एके दिवशी सकाळी मी उठलो आणि चेंडू वेगळ्या पद्धतीनं बनवण्याचा निर्णय घेतला अशातला प्रकार नाही, असंही सांगण्यास ते विसरत नाहीत…
- ‘चेंडू तयार करण्याची एक ठरलेली प्रक्रिया आहे. पण परिवर्तनशील घटकांचाही विचार केला पाहिजे’, असं जाजोदिया म्हणतात. त्यांच्या मते, गेल्या काही वर्षांत इंग्लंडमध्ये खेळपट्टी बनविण्याची प्रक्रिया बदललीय, पृष्ठभाग टणक झालेत…‘टी20’ आणि ‘द हंड्रेड’साठी टणक खेळपट्ट्या तयार करण्याचा दबाव असतो. आता मर्यादित षटकांचे सामने जास्त होतात. शिवाय आजकाल कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजांकडून खूप फटकेबाजी होते हे लक्षात घेतलं पाहिजे. चेंडू सीमारेषेवरील टणक पृष्ठभागावर खूप जास्त वेळा आदळतो. त्याचा परिणाम चेंडूच्या आकारावर आणि कडकपणावर होईलच’, असं त्यांना वाटतं…
- विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी भारतात वापरल्या जाणाऱ्या ‘सॅन्सपॅरील्स ग्रीनलँड्स’ (एसजी) चेंडूरवही अशीच टीका होऊ लागली होती. ‘एसजी’नं त्यावर काम केलं आणि कडकपणा टिकवून ठेवण्याचा मार्ग शोधला…जाजोदिया म्हणतात की, ते इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाच्या संपर्कात आहेत आणि ‘आयसीसी’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत…
– राजू प्रभू









