सर्वांच्या बैठकीत चर्चेने ठरणार नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष
सांखळी : सांखळी नगरपालिका निवडणुकीचा निकाल हाती येऊन भाजपचे 11 नगरसेवक निवडून आले. आता या 11 सदस्यीय गटातील पहिला नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष कोण याबाबत सांखळीत सर्वांमध्ये उत्सुकता पसरली आहे. नगराध्यक्षपद यावेळी महिलांसाठी राखीव आहे, तर उपनगराध्यक्षपद खुले आहे. सध्या निवडून आलेल्या भाजप गटात सहा महिला तर 5 पुरूष नगरसेवक आहेत. सांखळी नगरपालिकेची ही चौथी निवडणूक. या नगरपालिकेचे नगराध्यक्षपद हे आजपर्यंत महिलांसाठी राखीव नव्हते. यावेळी प्रथमच महिलांना नगराध्यक्षपदी बसण्याची संधी या आरक्षणातून मिळत आहे. त्यामुळे या आरक्षित नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर सर्वप्रथम कोण बसणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. आता निवडून आलेल्या महिला नगरसेवकांमध्ये रश्मी देसाई, निकीता नाईक, सिध्दी परोब, विनंती पार्सेकर, दिपा जल्मी व अंजना कामत यांचा समावेश आहे. या सहापैकी रश्मी देसाई यांनी यावेळी निवडून येत हॅट्ट्रिक केली आहे. मागील दोन निवडणुका जिंकून दहा वर्षे नगरसेवक म्हणून काम करण्याचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. शिवाय धर्मेश सगलानी यासारख्या प्रस्थापित नेत्याचा पराभव करून त्या जायंट किलरही ठरल्या आहेत. त्यामुळे या पदासाठी त्यांना पहिली पसंती देण्यात येईल अशी चर्चा शहरात सुरू आहे.
नव्याने निवडून आलेल्या निकीता नाईक, सिध्दी परोब यांच्याकडेही तसा सामाजिक, पक्षकार्याचा बराच अनुभव आहे. परंतु या दोन्हीसह इतर तीनही नगरसेविका या नव्यानेच निवडून आल्याने त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या वर्णीबाबत काही काळानंतर विचार होऊ शकतो, असेही बोलले जाते. यावेळी नगराध्यक्षपद महिला राखीव असल्याने खुले असलेल्या उपनगराध्यक्षपदाकडेही लोकांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजप गटात सध्या पाच पुरूष नगरसेवक आहेत. सर्व पाचही नगरसेवक हे माजी नगरसेवक असून त्यांच्याकडे नगरपालिकेचा चांगलाच अनुभव आहे. पैकी रियाझ खान, यशवंत माडकर यांनी नगराध्यक्ष म्हणूनही कारभार पाहिला आहे. त्यातच यशवंत माडकर यांनी सलगपणे चारही निवडणुका निवडून येण्याचा विक्रम केला आहे. दयानंद बोर्येकर यांनी यावेळी हॅट्ट्रिक साध्य केली आहे. ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे जवळचे आहेत. आनंद काणेकर हे एक बुजुर्ग नगरसेवक व भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. तर ब्रह्मानंद देसाई हेही सलगपणे निवडून आलेले आहेत. त्यामुळे यापैकी कोणाची वर्णी सर्वप्रथम उपनगराध्यक्ष म्हणून लागणार या विषयावर शहरात चर्चेला उधाण आले आहे. उपलब्ध माहिती नुसार सांखळी पालिका नगराध्यक्षपदासाठी तीन महिला विजयी नगरसेवक आपापल्यापरीने नगराध्यक्षपद मिळावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. भाजप मंडळात हा विषयही विचारधीन असल्याचे समजते. यासाठी भाजप गोटात संगीत खुर्चीची रंगीत तालीम होणार असल्याचे समजते. मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे स्थिर प्रशासन देण्याकडे भर देतील आणि योग्य उमेदवारास नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष देतील असा विश्वास सांखळीतील जनता व्यक्त करत आहे. तसेच निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन चर्चेतून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाची निवड होईल असे बोलले जात आहे.तरीही रश्मी देसाई आणि आनंद काणेकर नावाची चर्चा शहरात सुरू आहे.









