पालकमंत्री गोविंद कारजोळ यांची जिल्हाधिकाऱयांना सूचना : कारभार सुधारला नाही तर गय करणार नाही
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजन तसेच औषधांचा साठा सरकारकडून उपलब्ध आहे. त्याचा योग्य वापर करावा. कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास त्या थेट सांगाव्यात. बिम्सबद्दल तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत बिम्सच्या संचालकांना वारंवार सूचना करण्यात आल्या आहेत. तरीदेखील त्यामध्ये सुधारणा होत नसेल तर येथील अधिकारी व डॉक्टरांना सेवेतून बडतर्फ करा, अशी सूचना पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांनी जिल्हाधिकाऱयांना केली आहे.
कोरोना संदर्भातील आढावा आणि पूर व्यवस्थापन तयारीसंदर्भात सरकारी विश्रामधाम येथे उपमुख्यमंत्र्यांनी ही बैठक घेतली. या बैठकीमध्ये बिम्सबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जे कर्मचारी काम करणार नाहीत, त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱयांना आहेत. अशा कठीण परिस्थितीत जर अधिकारी व डॉक्टर काम करत नसतील तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, असे त्यांनी यावेळी सांगितले.
दररोज अहवाल आवश्यक
बिम्सच्या वैद्यकीय संचालकांनी दररोज अहवाल दिला पाहिजे. ते जर अहवाल देत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. एकूणच बिम्सबद्दल वाढलेल्या तक्रारी पाहून पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी जिल्हाधिकाऱयांना त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत बैठकीत सूचना दिली आहे.
ब्लॅक फंगसवर तातडीने
उपचार करा
ब्लॅक फंगसच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तेव्हा अशा रुग्णांवर तातडीने उपचार करणे गरजेचे आहे. सर्व औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे. तेव्हा त्या औषधांचा वापर करून तातडीने रुग्णांवर उपचार करून त्यांना मदत करा, असे जिल्हाधिकाऱयांनी यावेळी सांगितले.
स्मार्टसिटीची कामे युद्धपातळीवर करा
स्मार्टसिटीबाबतही पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी आढावा घेतला. लॉकडाऊन काळातही ही कामे तातडीने पूर्ण करा. पूर्ण झालेल्या कामांची देखभाल करा. जे अर्धवट प्रकल्प आहेत ते पूर्ण करा. रस्त्यांची कामे प्रथम पूर्ण करावीत, असे त्यांनी यावेळी सांगितले. सौरऊर्जेबाबतही त्यांनी सूचना केल्या आहेत. सौर पॅनेल बसविण्याचा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे. एकूणच स्मार्टसिटीच्या कामाबाबत स्मार्टसिटीचे व्यवस्थापकीय संचालक शशिधर कुरेर यांच्याबरोबर त्यांनी चर्चा केली आहे.
लघु पाटबंधारे खात्याने घेतलेली कामेदेखील पूर्ण करावीत. भू-संपादन प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. एकूणच पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांनी जिल्हय़ातील सर्व कामांचा आढावा घेतला आणि अधिकाऱयांना सूचना केल्या.
या बैठकीला जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप, महापालिका आयुक्त जगदीश के., अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी एस. व्ही. मुन्याळ, कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील आदी उपस्थित होते.
चौकट
पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज रहा
आता मान्सूनला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आतापासूनच पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज राहावे. नदीकाठावरील जवळपास 377 खेडय़ांना दरवषी फटका बसत आहे. त्या ठिकाणी अधिक लक्ष द्या. त्यांची सुरक्षा आणि पुनर्वसन करण्यासाठी योग्यवेळी पावले उचला. त्याबाबत गाफील राहू नका, असे पालकमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱयांना सांगितले. पूर परिस्थितीमध्ये सापडलेल्या साऱयांना निवाऱयासाठी केंद्र स्थापन करा. त्यांना सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी ठेवा. जनावरांचा चारा तसेच त्यांना लसदेखील वेळेत देण्यासाठी प्रयत्न करा, असे त्यांनी सांगितले.
चौकट
महाराष्ट्राच्या संपर्कात रहा
महाराष्ट्रातून कर्नाटकातील कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा, हिरण्यकेशी या नद्यांना पाणी येत असते. सर्वात जास्त कृष्णा नदीला पाणी सोडले जाते. महाराष्ट्रामध्ये अधिक पाऊस झाल्यानंतर पाणी अधिक येते. तेव्हा महाराष्ट्राच्या संपर्कात सतत रहा, असे त्यांनी सांगितले.