मुंबई \ ऑनलाईन टीम
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांणा उधाण आलं. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमागचं कारण स्पष्ट केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवार यांची सोमवारी सदिच्छा भेट घेतल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली.
नवाब मलिक म्हणाले की, महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दुश्मनासारखे काम करत नाहीत ही महाराष्ट्राची परंपरा आहे. इथे व्यक्तीगत नाती टिकवली जातात शिवाय व्यक्तीगत गाठीभेटी या होत असतात. परंतु या भेटी राजकीय कारणासाठी होतात असा अर्थ काढणे चुकीचे असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
विरोधी पक्षाचे काम विरोधी पक्ष करत असतो तर सत्ताधारी सत्ताधाऱ्यांचे काम करत असतात. महाविकास आघाडी शरद पवारसाहेबांनी बनवली आहे. त्यामुळे कुणीही या भेटीचा चुकीचा अर्थ लावून प्रचार करू नये. शिवाय देवेंद्र फडणवीस यांनी ही सदिच्छा भेट होती असे जाहीर केले आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.
Previous Articleजिल्हय़ात सोमवारी 2100 रुग्ण कोरोनामुक्त
Next Article बिम्समधील कुचकामी डॉक्टर-अधिकाऱयांवर कारवाई करा








