कोरोनाच्या नव्या संकरावताराचा प्रभाव : वेल्समध्ये दर 60 जणांपैकी एक संक्रमित
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या संकरावताराचा घातक प्रभाव दिसून येत आहे. केवळ इंग्लंडमध्येच दर 85 पैकी एक व्यक्ती कोरोनाने संक्रमित आढळली आहे. याचमुळे पूर्ण ब्रिटनमध्ये लाखो लोकांनी मित्र तसेच कुटुंबीयांपासून दूर राहून साधेपणाने नाताळ साजरा केला आहे. एनएचएसच्या टेस्ट अँड ट्रेस नेटवर्कच्या आकडेवारीनुसार 10 ते 16 डिसेंबरदरम्यान 1,73,875 लोक बाधित आढळले असून हा कुठल्याही आठवडय़ातील उच्चांकी आकडा आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार ब्रिटनच्या काही हिस्स्यांमध्ये कोरोना संक्रमण वाढत आहे. वेल्समध्ये चाचण्यांमध्ये सुमारे 60 पैकी 1 जण बाधित आढळला आहे. घातक विषाणूचा नवा प्रकार फैलावल्याने देशभरात वेगाने रुग्ण वाढत असल्याचे तज्ञांचे मानणे आहे.
टाळेबंदीत बहुतांश भाग
नव्या संकरावतारामुळे ब्रिटनच्या बहुतांश भागांत कठोर टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. लंडन आणि नजीकच्या क्षेत्रांमध्ये टियर 4 स्तराची जवळपास पूर्ण टाळेबंदी आहे. नव्या वर्षात कोरोनाच्या नव्या संकरावताराच्या संक्रमणाला नियंत्रणाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी कठोर निर्बंधांची गरज असल्याचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले आहे.
कठोर निर्बंधांचे संकेत
या कठिण काळाला आम्हाला सामोरे जावे लागणार आहे. अत्यंत कठोर निर्बंध लागू करावे लागणार आहेत. जानेवारीत हे संक्रमण नियंत्रणाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी हे आवश्यक आहे. आगामी वसंत ऋतूपर्यंत लसीकरण झाल्याने जनजीवन सुरळीत होणार असल्याचे जॉन्सन म्हणाले.
6 लाखांहून अधिक जणांना लस
आरोग्य आणि सामाजिक देखभाल विभागाकडून चालू आठवडय़ात प्रसिद्ध आकडेवारीनुसार 6,16,933 जणांना फायजर-बायोएनटेक कंपनीची कोरोनावरील लस देण्यात आली आहे. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय आणि त्यांच्या पतीने साधेपणाने नाताळ साजरा केला आहे. शाही दांपत्याने दक्षिणपूर्व इंग्लंडमध्ये बर्कशायर काउंटीच्या विंडसर राजवाडय़ात सण साजरा केला आहे.









