प्रतिनिधी / वास्को
लंडनहून दोहा कतारमार्गे 280 खलाशांना घेऊन गोव्याकडे प्रयाण केलेले विमान काल शनिवारी पहाटे एकच्या सुमारास दाबोळी विमानतळावर दाखल झाले. कतार एअरवेज क्यूआर 7485 या विमानातून हे खलाशी उतरले. या प्रवाशांची आरोग्य तपासणी करून त्यांना कदंब बसमधून उत्तर गोव्यातील हॉटेलमध्ये कॉरन्टाईनसाठी पाठविण्यात आले.
दरम्यान, विविध देशांत अडकलेले सुमारे दीड हजार गोमंतकीय खलाशी बुधवार दि. 17 रोजी गोव्यात जहाजातून दाखल होणार आहेत. हे खलाशी सेलेब्रिटी इन्फीनिटी पर्यटक जहाजांतून येणार आहेत.
शनिवारी दाबोळी विमानळावर 213 प्रवासी दाखल
देशांतर्गंत हवाई प्रवासात काल शनिवारी दाबोळी विमानतळावर चार विमानांतून 213 हवाई प्रवासी उतरले. परतीच्या प्रवासात या चार विमानांतून 362 प्रवाशांनी हैंद्राबाद, बेंगळूर व दिल्लीला जाण्यासाठी उड्डाण केले.
काल शनिवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास बेंगळूरहून इंडिगो एअरलाईन्सचे विमान 38 प्रवाशांसह दाखल झाले. हेच विमान 2.15 वा. 53 प्रवाशांसह बेंगळूरकडे मार्गस्थ झाले. दुपारी साडेबाराच्या सुमारास इंडिगो एअरलाईन्सचे विमान 25 प्रवाशांसह हैद्राबादहून दाबोळी विमानतळावर दाखल झाले. याच विमानातून दुपारी दोनच्या सुमारास 102 प्रवाशांनी हैद्राबादला प्रयाण केले.
त्यानंतर दीडच्या सुमारास विस्तारा फ्लाईटसचे विमान 67 प्रवाशांसह दिल्लीहून दाबोळी विमानतळावर दाखल झाले. याच विमानातून 97 प्रवाशांनी दिल्लीकडे प्रयाण केले. दोनच्या सुमारास इंडिगो एअरलाईन्सचे विमान 83 प्रवाशांसह दिल्लीहून दाबोळी विमानतळावर दाखल झाले. याच विमानातून 110 प्रवाशांनी दिल्लीकडे प्रयाण केले.
काल एकूण 213 प्रवासी गोव्यात हवाईमार्गे दाखल झाले. तर एकूण 362 प्रवाशांनी हैद्राबाद, बेंगळूर व दिल्लीकडे उड्डाण केले.









