नात्यातील तरुणाकडून साथीदारांच्या मदतीने सपासप वार
बेळगाव : शहाबंदर (ता. हुक्केरी) येथील एका तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून भीषण खून करण्यात आला आहे. बुधवार दि. 17 सप्टेंबर रोजी रात्री ही घटना घडली असून यमकनमर्डी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. महांतेश सिद्धाप्पा बुकनट्टी (वय 24) राहणार शहाबंदर असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. त्याचाच नातेवाईक असणारा बसवराज बुकनट्टी व त्याच्या साथीदारांनी हे कृत्य केले आहे. अनैतिक संबंधातून महांतेशचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर बेळगाव येथील एका कॉलेजमध्ये महांतेश नोकरी करीत होता. बुधवारी तो आपल्या गावी गेला. बसमधून उतरून घरी जाताना त्याच्यावर पाळत ठेवलेल्या बसवराज व त्याच्या साथीदारांनी तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून त्याचा खून केला आहे.
घटनेची माहिती समजताच यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महांतेश अद्याप जिवंत असणार म्हणून त्याला रात्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. गुरुवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. संशयित आरोपी बसवराजच्या पत्नीबरोबर महांतेशचे अनैतिक संबंध होते. वर्षापूर्वीच हे उघडकीस आले होते. त्यावेळी पंचांनी दोघांनाही समजूत देऊन हे प्रकरण मिटवले होते. याच कारणाने महांतेशचा खून करण्यात आला आहे. सुरुवातीला त्याच्या पायावर वार करण्यात आला. तो खाली पडताच छातीवर व मानेवर सपासप वार करून महांतेशचा खून करण्यात आला आहे. महांतेश हा बेळगाव येथील एका कॉलेज लायब्ररीमध्ये काम करीत होता. यमकनमर्डी पोलीस पुढील तपास करीत आहेत.









