कोल्हापूर :
रुईकर कॉलनी येथे बंद बंगला चोरट्यांनी अवघ्या 20 मिनीटांमध्ये फोडला. 30 तोळे सोन्याचे दागिने आणि 20 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केला. घराचे मालक दरवाजावर आल्याची चाहूल लागताच चोरटयांनी मुख्य दरवाजाला आतून कडी घालून टेरेसवरुन पाण्याच्या पाईपवरुन उतरुन पळ काढला. शनिवारी (29) रोजी दुपारी 2 वाजून 40 मिनीटांच्या आसपास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद सेवानिवृत्त कर्मचारी नामदेव दगडू खाडे (वय 57, रा. शिंदे रेसिडेन्सी, रुईकर कॉलनी) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नामदेव खाडे यांनी बीएसएनएलमधून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. ते कुटूंबासह रुईकर कॉलनी मधील शिंदे रेसिडेन्सी येथील साई समर्थ बंगल्यात राहतात. शनिवारी दुपारी ते मुलीसह रुग्णालयातील नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. 2 वाजून 40 मिनीटांनी ते घरातून बाहेर पडले होते. अवघ्या 20 मिनीटांमध्ये ते घरी परत आले. त्यावेळी दारात काही चपला दिसल्या. घरातून बोलण्याचा आवाज येताच, आत कोण आहे रे? अशी विचारणा खाडे यांनी केली. घरमालक आल्याची चाहूल लागताच चोरट्यांनी मुख्य दरवाजा आतून बंद करून टेरेसवरून पळ काढला. बेडरूममधील 30 तोळे दागिन्यांची हँडबॅग आणि 20 हजारांची रोकड घेऊन ते निघून गेले. टेरेसवरून निघणाऱ्या पाण्याच्या पाईपला धरून ते बंगल्याच्या मागे खाली उतरले. त्यानंतर शेजारच्या अपार्टमेंटच्या भिंतीवरून उड्या मारून रुक्मिणीनगरच्या दिशेने चोरटे पसार झाले. आपल्या घरामध्ये चोरी झाल्याचे लक्षात येताच खाडे यांनी याबाबतची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहिती घेत असताना 30 तोळे दागिने चोरीस गेल्याचे एwकताच शाहूपुरी पोलिसही चक्रावून गेले. त्यांनी या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना दिली. पोलीस निरीक्षक डोके पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून डोके यांनी या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली.

पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू, पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. शाहूपुरी पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक चोरट्यांचा शोध घेत आहे. दरम्यान घटनास्थळी ठसेतज्ञ आणि श्वानपथकास पाचारण करण्यात आले.
- चार चोरटे असण्याची शक्यता
या चोरीमध्ये चार चोरट्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. यापैकी दोघे जण बंगल्यामध्ये घुसले आहेत. तर दोघे जण बाहेर थांबले असल्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे. खाडे परत आल्यानंतर बाहेर थांबलेल्या दोघांनी घटनास्थळावरुन पळ काढला.
- संपूर्ण घरात पायाचे ठसे
चोरट्यांनी वरच्या मजल्यावरील दोन्ही बेडरुममधील कपाटातील साहित्य विस्कटले होते. एका कपाटातील दागिन्यांची हँडबॅग आणि रोकड त्यांच्या हाती लागली. त्यानंतर बाथरुममध्ये पाय धुवून चोरटे टेरेसवर गेले. त्यांच्या पायाचे ठसे घरात उमटले होते.
- गेटला कुलूप, मुख्य दरवाजाला लॅच
चार चोरट्यांनी गेटच्या वरुन बंगल्यात प्रवेश केला आहे. गेटला कुलूप असल्याने त्यांनी उडी मारुन बंगल्यात प्रवेश केला. मुख्य दरवाजाला लॅच असल्याने स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने लॅच उघडून घरात प्रवेश केला. यानंतर घरमालक आल्याचे समजताच त्यांनी मुख्य दरवाजाला आतून कुलूप लावून पळ काढला.
- चोरटे 25 ते 30 वयोगटातील
पोलिसांनी 15 ते 20 ठिकाणचे सिसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. यामध्ये चोरटे 25 ते 30 वयोगटातील असल्याचे दिसत आहेत. एका चोरट्याने चेक्सचा शर्ट, एकाने पांढरा शर्ट तर काळा शर्ट परिधान केल्याचे दिसत आहे. याच टोळीने 15 दिवसांपूर्वी कदमवाडी आणि धैर्यप्रसाद हॉल येथे चोरी केल्याची माहिती समोर आली आहे.
- पाच पथकांद्वारे शोध सुरु
दरम्यान या घटनेचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणची 3 तर शाहूपुरी पोलीस ठाण्याची दोन पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकास वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली आहे. सिसीटीव्ही फुटेज तपासणे, जुन्या घटनांचे सिसीटीव्ही फुटेज ताब्यात घेणे, अशा प्रकारे चोरी करणाऱ्या टोळ्यांची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.








