कोल्हापूर :
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार महावितरणकडून 1 एप्रिल 2025 पासून सर्व वर्गवारीतील ग्राहकांसाठी सरासरी 10 टक्के वीज दर कपात केले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणला वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले आहेत. मात्र या निर्णयाचा लाभ सर्वच ग्राहकांना होणार नसून तो फक्त स्मार्ट मीटर असलेल्या ग्राहकांना होणार आहे. त्यामुळे ही वीज दर सवलत मिळवण्यासाठी सर्वच ग्राहकांची स्मार्ट (टीओडी) मीटर बसविण्याची मानसिकता तयार करण्याचे महावितरणचे धोरण असल्याचे ग्राहक संघटना प्रतिनिधींचे मत आहे.
महावितरणने विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार सर्व निवासी ग्राहकांच्या टप्यांच्या वीज दरांमध्ये 10 ते 12 टक्क्यांच्या श्रेणीत एकूण कपात करण्यात आली आहे. वीज वापर टप्पा (1-100 युनिट्स) असलेल्या निवासी ग्राहकांसाठी वीज दरांमध्ये आर्थिक वर्ष 2029-30 पर्यंत सुमारे 24 टक्के कपात होईल. तसेच, आयोगाने निवासी ग्राहकांना सौर वेळेमधील (सकाळी 9 ते सायं. 5) वीज वापरासाठी 0.80 ते 1.00 प्रति युनिट टीओडी (टाईम ऑफ डे) सवलत दिली आहे.
महायुती सरकारने आपल्या जाहीरानाम्यात वीजदर कपातीविषयी माहिती दिली होती. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या 5 वर्षांत महाराष्ट्रात विजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली होती. यावर 1 एप्रिलपासून राज्यात विजेचे नवे दर लागू होणार आहेत. महावितरणकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्यात पुढील 5 वर्षे वीजेचा दर कमीच राहणार आहे.
घरगुती वीज वापरणाऱ्या बहुतांशी ग्राहकांकडे बसविलेल्या मीटरमध्ये टीओडीची सुविधा नाही. टीओडी सुविधा (वीज दर सवलत) मिळण्यासाठी वीज ग्राहकाने कोणत्या वेळेला विजेचा वापर केला हे समजणे आवश्यक आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांना टीओडी सवलतीचा लाभ घेता यावा यासाठी महावितरणकडून मोफत टीओडी (स्मार्ट) मीटर बसवून देण्यात येणार आहेत.
- कृषी वीज दरात टप्प्याटप्प्याने वाढ
कृषी फिडर्सच्या सौर ऊर्जीकरणामुळे, शेतीला वीज पुरवठा करण्यासाठी येणाऱ्या पुरवठ्याचा खर्च कालांतराने कमी होण्याची अपेक्षा आहे. आयोगाने कृषी विभागाच्या वीज दराची रचना कृषी वीज दरात टप्प्याटप्प्याने वाढ होऊन ते सरासरी वीज पुरवठा आकारांशी सुसंगत होतील अशी केली आहे. विखुरलेल्या सौर ऊर्जा निर्मितीच्या प्रसारासह कालांतराने कृषी वीज दरात कपात होण्याचा अंदाज केला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आयोगाने पहिल्या दूध शीतकरण प्रक्रियेसाठी व संबंधित संकलन केंद्रांसाठी तसेच खवा उत्पादक संस्थांसाठी कृषी (अन्य) वर्गवारी मधील वीज दर लागू केले आहेत.
- पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न
राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी, आयोगाने निवासाची सुविधा असणाऱ्या हॉटेल्स, रिसॉर्ट, गेस्ट हाऊसचा समावेश औद्योगिक वीज दर वर्गवारीत केला आहे. यामुळे पूर्वी वाणिज्यिक वर्गवारीत समाविष्ट असलेल्या हॉटेल्सच्या वीज बिलांमध्ये लक्षणीय कपात होणार आहे. राज्यातील पर्यटन उद्योगाच्या वाढीस यामुळे चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.
- यंत्रमागधारकधारकांना ऊर्जा आकारात 2.5 टक्के सवलत
यंत्रमाग ग्राहकांसाठी कमी वीज दराचा लाभ आयोगाने एलटी–औद्योगिक अंतर्गत मंजूर ऊर्जा आकारांऐवजी यंत्रमाग ग्राहकांसाठी ऊर्जा आकारामध्ये (2.5 टक्के) कमी वीज दर सवलत कायम ठेवली आहे.
- वीज दरातील सुधारणा आणि क्रॉस–सबसिडीत सुसुत्रता
आयोगाने, कृषी (एलटी आणि एचटी) आणि एलटी पीडब्ल्यूडब्ल्यु वर्गवारी वगळता बहुतांश इतर ग्राहक वर्गवारीमधील वीज दरामध्ये एकंदरीत कपात मंजूर केली आहे. आयोगाने, 29 डिसेंबर, 2022 रोजी ऊर्जा मंत्रालयाच्या अधिसूचनेस अधीन राहून सर्व ग्राहक वर्गवारींची क्रॉस सबसिडी 20 टक्केंच्या टप्प्यांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. याव्यतिरिक्त, स्थिर आकारांमधून मिळणाऱ्या महसुली वसुलीमध्ये थोडी सुधारणा होण्यासाठी आयोगाने सर्व ग्राहक वर्गवारींच्या स्थिर आकारांमध्ये किरकोळ वाढ लागू केली आहे. तथापि, स्थिर, मागणी आकारामधून होणारी वसुली एकूण महसुलाच्या सुमारे 20 टक्के आहेत. ऊर्जा आकारांमध्ये जास्त कपात केल्यामुळे स्थिर आकारांमधील अशा किरकोळ वाढीचा परिणाम नगण्य असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे
- औद्योगिक ग्राहकांसाठी 2025-26 साठी सुमारे 11 टक्के कपात
औद्योगिक आयोगाने, एचटी औद्योगिक वर्गवारीतील क्रॉस सबसिडीच्या पातळीत विद्यमान 113 टक्केवरुन 101 टक्के इतकी आणि एलटी–औद्योगिक वर्गवारीसाठी विद्यमान 108 टक्के वरून 100 टक्के इतकी कपात केली आहे. या आदेशामध्ये मान्यता दिल्यानुसार, एचटी–औद्योगिक वर्गवारीसाठी विजेच्या एकूण सरासरी किमतीत सुमारे (-15 टक्के) कपात केली आहे. तर एलटी–औद्योगिक वर्गवारीच्या बाबतीत विजेच्या सरासरी किंमतीत आर्थिक वर्ष 2025-26 साठी सुमारे (-11 टक्के) इतकी कपात केली आहे.
- वाणिज्यिक ग्राहकांसाठी 2025-26 दरम्यान होणार 30 टक्के दर कपात
एचटी–वाणिज्यिक वर्गवारीच्या बाबतीत, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये एचटी–वाणिज्यिक साठी क्रॉस सबसिडीच्या पातळीत विद्यमान 174 टक्के वरून 127 टक्के इतकी आणि एलटी–वाणिज्यिकसाठी विद्यमान 151 टक्के वरून 130 टक्के इतकी कपात केली आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान एचटी वाणिज्यिक वर्गवारीसाठी वीज दर सुमारे 30 टक्केंनी कमी होतील आणि एलटी वाणिज्यिक वर्गवारीसाठी वीज दर सुमारे 20 टक्केंनी कमी होतील. वाणिज्यिक वर्गवारीसाठी वीज दर अद्याप सरासरी वीज पुरवठा आकारापेक्षा जास्त आहे.
- विद्युत वाहनांसाठीही वीज दर सवलत
विद्युत वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी, विद्युत वाहनांसाठीचे वीज दर टीओडी लाभांसह सरासरी वीज पुरवठा आकारापेक्षा कमी ठेवण्यात आले आहेत. स्थिर मागणी आकार काढून टाकल्यामुळे विद्युत वाहनांसाठीचे वीज दर सध्याच्या वीज दर पातळीवरुन 8-10 टक्क्यांनी कमी होतील.
- सायंकाळी 5 ते रात्री 12 पर्यंत वापरावी लागणार महावितरणची वीज
रूफटॉप सौर यंत्रणा असलेल्या निवासी ग्राहकांना टीओडी मीटर बसविल्यानंतर महावितरणकडे जमा असलेल्या ऊर्जेचा वापर पीक तास वगळता (सायंकाळी 5 ते रात्री 12) सर्व तासांदरम्यान करता येणार आहे म्हणजेच यावेळेत सर्व निवासी ग्राहकांना महावितरणचीच वीज वापरणे बंधनकारक राहणार आहे.
- स्वतंत्र कृषी वीज पुरवठा कंपनी स्थापन करण्याचा निर्णय
महावितरणने स्वतंत्र कृषी वीज पुरवठा कंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला असून 1 एप्रिल 2028 पर्यंत किंवा त्यापूर्वी सदरची स्वतंत्र कंपनी अंमलात येईल. यासाठी महावितरणकडून पूर्वतयारी सुरु केली आहे.








