आभूषणे किंवा दागिने यांचे आकर्षण मानवाला अत्यंत प्राचीन काळापासूनच आहे. मानव जेव्हापासून वेगवेगळी आयुधे, अवजारे आणि साधने निर्माण करु लागला तेव्हाच त्याने आभूषणे निर्माण करण्याचे शास्त्र आणि कला आत्मसात केली. निसर्गात सापडणाऱ्या नाजूक वस्तूंपासून त्याने प्रथम आपल्याला जमतील तशी आणि नंतर आपल्याला आवडतील तशी आभूषणे निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि अनेक सहस्र वर्षांच्या अंतरात हे कौशल्य विकसीत केले. सांप्रतच्या काळात तर आभूषणे करण्याच्या कलेला अत्याधुनिक यंत्रांची आणि संगणकीय तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने असंख्य प्रकारची आभूषणे निर्माण केली जात आहेत.
सर्वात प्राचीन आभूषणे कोणती, या प्रश्नाचे उत्तरही संशोधकांनी शोधले आहे. आभूषणे निर्माण करण्यास मानवाने साधारणत: 80 हजार वर्षांपूर्वी प्रारंभ केला असावा, असे मानले जाते. संशोधकांनी अशी अनेक प्राचीन आभूषणे शोधण्यात यश मिळविले आहे. आतापर्यंत सापडलेल्यांमध्ये सर्वात प्राचीन आभूषणे शिंपल्यांपासून बनविलेली असून ती कर्णफुलांच्या स्वरुपात आहेत. त्यांची निर्मिती 70 हजार वर्षांपूर्वी करण्यात आल्याचे दिसून आले आहे. बल्गेरिया, इटली, जर्मनी आदी देशांमधील प्राचीन गुहा आणि पुरातत्व स्थानांच्या उत्खननात अशी अनेक आभूषणे आढळली आहेत आणि ती 30 ते 60 हजार वर्षांपूर्वीची आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या बोंबास गुहांमध्ये मौल्यवान दगड, प्राण्यांचे दात, हाडे आणि अंड्यांच्या कवचांपासून निर्माण केलेली आभूषणे गवसली आहेत. ती 50 हजार ते 20 हजार वर्षांपूर्वीची असल्याचे आढळले आहे. काही आभूषणे भिन्न भिन्न रंगांनी रंगविली असल्याचेही दिसून येते. ही अतिप्राचीन आभूषणे मानली जातात.









