बाजारात महिलांची वर्दळ : शहर-ग्रामीण भागात लक्ष्मीचे व्रत करणाऱ्या महिला अधिक
बेळगाव : दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बाजारात लक्ष्मीचे व्रत करणाऱ्या महिलांची वर्दळ वाढली होती. विशेषत: पूजेचे साहित्य व फळा-फुलांची खरेदी अधिक प्रमाणात झाली. डिसेंबर प्रारंभापासून मार्गशीर्ष महिन्याला प्रारंभ झाला आहे. 5 रोजी पहिला गुरुवार, 12 रोजी दुसऱ्या गुरुवारचे व्रत केले जाणार आहे. यासाठी बुधवारी सायंकाळी महिलांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. मार्गशीर्ष गुरुवारच्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध फुले, हार, केळी व इतर फळांची खरेदी होऊ लागली आहे. फळांची विक्री वाढल्याचेही दिसत आहे. शहरासह ग्रामीण भागात लक्ष्मीचे व्रत करणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बाजारात पूजेचे साहित्य व फळांची खरेदी होऊ लागली आहे. दुसरीकडे महिलांकडून मांसाहार वर्ज्य केला जातो. त्यामुळे मांसाहाराची मागणीही घटली आहे. डिसेंबर महिन्यात चार गुरुवार व्रत केले जाणार आहे. दोन गुरुवारानंतर आता 19 व 26 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत होणार आहे.









