शासनाचे दुर्लक्ष, शेतकरी नाराज, निधीची कमतरता
बेळगाव : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा नद्यांवरील कालव्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. निधीअभावी आणि इतर कारणांमुळे कालवे अर्धवट स्थितीत बंद पडले आहेत. काही ठिकाणी या कामाला सुरुवात झालीच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे कालव्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे. गोकाक, हुक्केरी, बैलहोंगल, सौंदत्ती तालुक्यांतील 131 गावांना कायमस्वरुपी पिण्याचे पाणी देण्यासाठी पेयजल योजनेंतर्गत कालवे बांधण्यात येणार होते. मात्र, भू-संपादनाच्या मुद्द्यामुळे ही कामे अर्धवट पडली आहेत. त्याबरोबरच गोकाक तालुक्यातही जलसंपदा विभागामार्फत 638 हेक्टर जमीन निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी तरी हा प्रकल्प मार्गी लागणार का? हेच पाहावे लागणार आहे.
बळ्ळारीचे निम्मे काम
2008 पासून भू-संपादन, अनुदान आणि इतर कारणांमुळे बळ्ळारी नाला प्रकल्पाची कामे रखडली आहेत. कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर होऊनदेखील कालव्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. शेतजमीन सिंचनाखाली येणाऱ्या बळ्ळारी नाला प्रकल्पातील कालव्यांची कामे निम्मीच पूर्ण झाली आहेत.
किणये धरणाचे बांधकामही रखडले
बेळगाव तालुक्यातील किणये गावाजवळ मुंगेत्री नदीवर जलसंपदा विभागामार्फत बांधण्यात येणाऱ्या धरण प्रकल्पाचे कामही रखडले आहे. तब्बल 80 कोटींच्या निधीतून उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प अर्धवट स्थितीत आहे. किणये, बहाद्दरवाडी, रणकुंडये, संतिबस्तवाड आदी गावांतील शेतकऱ्यांना हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे.









