समस्या लागणार मार्गी, संपूर्ण माहिती उपलब्ध, कृषी खात्याचा निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
शेतकऱ्यांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी कृषी विभागाने एका नवीन अॅपची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने मार्गी लागणार आहेत, अशी माहिती कृषीमंत्री एन. चेलुवरायस्वामी यांनी दिली.
या अॅपद्वारे शेतकऱ्यांना हवामान आणि मातीच्या गुणवत्तेबाबतदेखील अंदाज घेता येणार आहे. याबरोबर बी-बियाणे, खते, पिकांचे नमुने आणि इतर कृषी आधारित माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हा अॅप शेतकऱ्यांना आधार ठरणार आहे. विशेषत: 14 भाषांमध्ये या अॅपचा वापर करता येणार आहे. त्यामुळे बहुभाषिक शेतकऱ्यांनादेखील या अॅपची मदत होणार आहे.
या अॅपद्वारे शेतकऱ्यांना भविष्यातील हवामान आणि इतर बाबींचीही माहिती दिली जाणार आहे. विशेषत: शेतीच्या बांधावर ही माहिती उपलब्ध होणार आहे. याबरोबरच शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. मात्र या हेल्पलाईनमुळे मदतीऐवजी गोंधळच अधिक होऊ लागला आहे. त्यामुळे सर्व हेल्पलाईन विलीन करून शेतकऱ्यांसाठी एकच कॉल सेंटर सुरू करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.









