ओपन हार्ट सर्जरीनंतर बायपास ग्राफ्ट पूर्ण
प्रतिनिधी/ बेळगाव
हृदयरोगाने त्रस्त असलेल्या 87 वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर येथील केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली आहे. कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टनंतर केवळ सात दिवसात पूर्णपणे बरे होऊन ते वृद्ध घरी गेले आहेत.
भाग्यनगर येथील रहिवासी राजशेखर यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉ. रिचर्ड साल्ढाणा व त्यांचे सहकारी या कामी यशस्वी झाले आहेत. अँजिओग्राफीनंतर हा वृद्ध हृदयरोगाने त्रस्त असल्याचे आढळून आले. त्यांना रक्तसंचार पूर्णपणे बंद झाल्यामुळे चालता येत नव्हते. छातीत कळा येत होत्या. श्वसनाचा त्रास जाणवत होता. अस्वस्थता वाटत होती. त्यामुळे सतत तीन तासांची शस्त्रक्रिया करून त्यांना या त्रासातून बाहेर काढण्यात आले.
शस्त्रक्रियेनंतर केवळ तीन दिवसात हे वृद्ध उठून बसले. त्यांना चालायलाही येऊ लागले. सातव्या दिवशी त्यांना घरी जाऊ देण्यात आले. वयाची शंभरी पार करण्याचे उद्दिष्ट ठेवलेल्या या निवृत्त शिक्षकावरील यशस्वी शस्त्रक्रियेने कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित झाला आहे. ही शस्त्रक्रिया क्लिष्ट व कठीण होती, असे डॉ. रिचर्ड साल्ढाणा यांनी सांगितले. चार दशकातील आपल्या वैद्यकीय सेवेत हे सर्वात ज्येष्ठ रुग्ण असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
आतापर्यंत डॉ. रिचर्ड यांनी 27,270 हून अधिक ओपन हार्ट सर्जरी शस्त्रक्रिया केल्या आहेत. भूलतज्ञ डॉ. शरणगौडा पाटील, डॉ. आनंद वाघराळी व इतर डॉक्टर, परिचारिका, फिजिओथेरपिस्ट यांचा समावेश असलेल्या पथकाचे हे सांघिक यश असल्याचे डॉ. साल्ढाणा म्हणाले. इस्पितळाचे वैद्यकीय संचालक डॉ. कर्नल एम. दयानंद यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या पथकाचे अभिनंदन केले आहे.









