सतीश जारकीहोळी यांना पीडब्ल्यूडी? लक्ष्मी हेब्बाळकर यांना महिला-बालकल्याण खाते शक्य :
प्रतिनिधी/ बेंगळूर
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्त्वातील मंत्रिमंडळात शनिवारी 24 आमदारांचा समावेश झाला आहे. 24 नूतन मंत्री शनिवारी राजभवनमध्ये शपथबद्ध झाले. याद्वारे पूर्ण प्रमाणातील मंत्रिमंडळ अस्तित्वात आले आहे. दरम्यान, सर्व मंत्र्यांना खातेवाटपही जवळपास निश्चित झाल्याचे समजते. बेळगाव जिल्ह्यातून मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना महिला-बालकल्याण आणि त्याचप्रमाणे यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांना सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी मिळू शकेल. मराठा समुदायातून मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व मिळालेल्या संतोष लाड यांना कामगार खाते मिळण्याची शक्यता आहे.

शनिवारी सकाळी 11:45 वाजता नूतन 24 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. सर्वप्रथम गदगचे आमदार एच. के. पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. जातीय समीकरणांचा विचार करून मंत्रिपदे देण्यात आल्याने 8 जिल्ह्dयांना मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. ज्येष्ठ आमदारांनाही मंत्रिपद हुकल्याने त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सर्व 34 जणांना खातेवाटप करण्यात आले. ही यादीही राज्यपालांकडे संमतीसाठी पाठविण्यात आली. शनिवारी दुपारी खातेवाटप झालेली यादी सर्वत्र व्हायरल झाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या खातेवाटपाच्या यादीविषयी राज्य काँग्रेसने ट्विट केले आहे. सदर यादी अधिकृत नाही. अद्याप खातेवाटप झालेले नाही. जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये. लवकरच खातेवाटप करण्यात येईल, असे सांगितले आहे.
दुपारी मंत्र्यांचा शपथग्रहण कार्यक्रम संपल्यानंतर सरकारकडून राज्यपालांकडे खातेवाटपाची यादी पाठविण्यात आल्याची चर्चा होती. खातेवाटपाविषयी घेण्यात आलेल्या निर्णयाला काही मंत्र्यांनी आक्षेप घेतल्याचे समजते. अमुक खाते हवे, अशी मागणी मंत्र्यांनी केल्याने रात्री उशिरापर्यंत काही मंत्र्यांना खातेवाटप करणे कठीण झाले. यावर रविवारी अंतिम निर्णय होऊ शकतो.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात समर्थक मंत्र्यांना प्रभावी खाते मिळवून देण्यासाठी जोरदार रस्सीखेच झाली आहे. काहींनी वजनदार खाते देण्यात येत असले तरी नकार दिल्याचे सांगण्यात आले आहे. डॉ. जी. परमेश्वर यांनी गृहखाते स्वीकारण्यात नकार दिल्याचे सुत्रांकडून समजते. दुसरीकडे शिवकुमार यांनी स्वत:जवळ पाटबंधारे आणि बेंगळुर शहर विकास खाते ठेवून घेतल्याची चर्चा आहे.
आठ आमदारांना प्रथमच मंत्रिपद
सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात अनेक ज्येष्ठ आमदारांना स्थान देण्यात आलेले नाही. त्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. 8 आमदारांना प्रथमच मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. त्यामध्ये लक्ष्मी हेब्बाळकर, भैरती सुरेश, मधु बंगारप्पा, के. एन. राजन्ना, बी. नागेंद्र, मंकाळू वैद्य, एन. एस. बोसराज, डॉ. एम. सी. सुधाकर या आमदारांचा समावेश आहे.
शपथबद्ध झालेल्या इतर आमदारांपैकी डॉ. एच. सी. महादेवप्पा आणि एच. के. पाटील चौथ्यांना मंत्री बनले आहेत. कृष्णभैरेगौडा, एन. चेलुवरायस्वामी व आर. बी. तिम्मापूर तिसऱ्यांदा मंत्रिपदावर आरुढ झाले आहेत. पिरियापट्टण वेंकटेश, रहिम खान, ईश्वर खंड्रे, दिनेश गुंडूराव, शिवानंद पाटील, डॉ. शरणप्रकाश पाटील, डी. सुधाकर, संतोष लाड, शिवराज तंगडगी हे दुसऱ्यांदा मंत्रिपद भूषवत आहेत.
सर्व समुदायांना प्रतिनिधीत्व
राज्य मंत्रिमंडळात जवळपास सर्व समुदायांना प्रतिनिधीत्व देऊन जातीय समतोल राखण्यात आला आहे. लिंगायत समुदायातून ईश्वर खंड्रे, लक्ष्मी हेब्बाळकर, शिवानंद पाटील, एम. बी. पाटील, एस. एस. मल्लिकार्जुन, डॉ. शरणप्रकाश पाटील, शरणबसप्पा दर्शनापूर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. रेड्डी समुदायातून रामलिंगा रेड्डी आणि एच. के. पाटील या ज्येष्ठ आमदारांना मंत्रिपद मिळाले आहे. वक्कलिग समुदायातून उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, चेलुवरायस्वामी, पिरियापट्टण वेंकटेश, कृष्णभैरेगौडा, डॉ. एम. सी. सुधाकर यांना प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. अनुसूचित जातीतून के. एच. मुनियप्पा, डॉ. जी. परमेश्वर, डॉ. एच. सी. महादेवप्पा, आर. बी. तिम्मापूर आणि प्रियांक खर्गे तसेच अनुसूचित जमातीतून वाल्मिकी समुदायातील सतीश जारकीहोळी, के. एन. राजन्ना, बी. नागेंद्र यांनी संधी मिळाली आहे. मागासवर्गातील राजू क्षत्रिय समुदायातील बोसराजू, बेस्त समुदायातील मंकाळू वैद्य, मराठा समुदारातील संतोष लाड, कुरुब समुदारातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि भैरती सुरेश तसेच ईडीग किंवा बिल्लव समुदारातील मधु बंगारप्पा यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व मिळाले आहे. मुस्लीम समुदारातून जमीर अहमद खान आणि रहिम खान, जैन समुदारातील डी. सुधाकर, ख्रिश्चन समुदायातील के. जे. जॉर्ज, ब्राह्मण समुदायातून दिनेश गुंडूराव मंत्रिमंडळात आहेत.
शपथविधी कार्यक्रमावर आमदारांचा बहिष्कार
मंत्रिमंडळात बेंगळूर शहर आणि ग्रामीण जिल्ह्याला झुकते माप देण्यात आले आहे. तर आठ जिल्ह्यांतील एकाही आमदाराला मंत्रिपद मिळालेले नाही. हावेरी जिल्ह्यातून काँग्रेसचे पाचजण निवडून आले आहेत. रुद्रप्पा लमाणी, बसराराज शिवण्णावर, प्रकाश कोळीवाड, यु. बी. बनकार, श्रीनिवास माने यापैकी कोणालाही मंत्रिपद देण्यात आलेले नाही. त्यामुळे या आमदारांनी मंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. अनेक आमदार कार्यक्रमाला अनुपस्थित होते.
मंत्रिमंडळात जातनिहाय प्राधान्य
लिंगायत 7
वक्कलिग 5
अनुसूचित जाती 6
अनुसूचित जमाती 3
कुरुब 2
रेड्डी 2
मुस्लीम 2
ईडीग 1
मराठा 1
ब्राह्मण 1
खिश्चन 1
जैन 1
बेस्त 1
राजू क्षत्रिय 1
एकूण 34
कोट्स…
नवे-जुन्या चेहऱ्यांचे मिश्रण
मंत्रिमंडळ नवे आणि जुन्या चेहऱ्यांचे मिश्रण आहे. मात्र, प्रथमच विधानसभेवर निवडून आलेल्यांना मंत्रिपद देण्यात आलेले नाही. जनतेने बदलाची अपेक्षा बाळगल्याने राज्य काँग्रेस सरकारने दिलेल्या आश्वासनांची पुर्तता व्हावी आणि प्रशासकीय कामकाजाला नवे स्वरुप देण्याच्या उद्देशाने या मंत्रिमंडळाची रचना करण्यात आली आहे.
– सिद्धरामय्या, मुख्यमंत्री
मंत्री आणि संभाव्य खाती….
नाव खाते
1. मुख्यमंत्री
सिद्धरामय्या अर्थ, मंत्रिमंडळ कामकाज, डीपीएआर, वार्ता
2. उपमुख्यमंत्री
डी. के. शिवकुमार पाटबंधारे, बेंगळूर शहर विकास
3. डॉ. जी. परमेश्वर गृह
4. एम. बी. पाटील अवजड आणि मध्यम उद्योग
5. सतीश जारकीहोळी सार्वजनिक बांधकाम
6. के. जे. जॉर्ज ऊर्जा
7. प्रियांक खर्गे ग्रामविकास-पंचायतराज
8. के. एच. मुनियप्पा अन्न-नागरी पुरवठा, ग्राहक कल्याण
9. जमीर अहमद खान गृहनिर्माण, वक्फ-अल्पसंख्याक कल्याण
10. रामलिंगा रेड्डी परिवहन
11. कृष्णभैरेगौडा महसूल
12. दिनेश गुंडूराव आरोग्य आणि कुटुंब कल्याण
13. संतोष लाड कामगार आणि कौशल्य विकास
14. डॉ. एम. सी. सुधाकर वैद्यकीय शिक्षण
15. लक्ष्मी हेब्बाळकर महिला-बालकल्याण, दिव्यांग-ज्येष्ठ नागरीक सक्षमीकरण
16. डॉ. शरणप्रकाश पाटील
17. एच. के. पाटील कायदा आणि संसदीय कामकाज
18. ईश्वर खंडे वन, पर्यावरण आणि जीवशास्त्र
19. रहिम खान नगरप्रशासन, हज
20. बी. नागेंद्र क्रीडा-युवजन सेवा, कन्नड-सांस्कृतिक
21. के. वेंकटेश पशूसंगोपन आणि रेशीम
22. मंकाळू वैद्य मत्स्योद्योग आणि बंदर विकास
23. मधु बंगारप्पा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण
24. एन. एस. बोसराजू पर्यटन, विज्ञान-तंत्रज्ञान
25. के. एन. राजण्णा सहकार
26. शरणबसप्पा दर्शनापूर लघु उद्योग, सार्वजनिक उद्योग
27. शिवानंद पाटील वस्त्राsद्योग आणि साखर
28. भैरती सुरेश नगरविकास-शहर नियोजन
29. एस. एस. मल्लिकार्जुन खाण-भूविज्ञान, बागायत
30. डी. सुधाकर योजना आणि सांख्यिकी
31. एन. चेलुरायस्वामी कृषी
32. शिवराज तंगडगी मागासवर्ग कल्याण
33. आर. बी. तिम्मापूर अबकारी आणि धर्मादाय
34. डॉ. एच. सी. महादेवप्पा समाजकल्याण









